
नंदुरबार जिल्ह्यात ६० हजार ९४६ कारागिरांची नोंदणी; १,०५२ जणांना टूलकिटचे वाटप
नंदुरबार, १७ सप्टेंबर (हिं.स.) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू केलेली प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही पारंपरिक कारागिरांच्या हाताला काम आणि त्यांच्या कलेला सन्मान देणारी योजना आहे. कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्यविकास आणि आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देत स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षम करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीर बिरसा मुंडा सभागृहात सेवा संकल्प अभियानांतर्गत पीएम विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळावा व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिलीप काकडे, एसबीआयचे महाव्यवस्थापक सुहास कोतकर, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक नंदनकुमार पैठणकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक दिनेश पाटील, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संदीप बोरसे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रुपेश पाटील आदी उपस्थित होते.
६० हजारांहून अधिक कारागिरांची नोंदणी
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले की, या योजनेच्या माध्यमातून पारंपरिक व्यवसाय करणारे कारागीर आपल्या कौशल्यातून विविध वस्तू तयार करीत आहेत. त्यांच्या पारंपरिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ६० हजार ९४६ कारागिरांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ३ हजार ५३७ कारागिरांना विश्वकर्मा ओळखपत्र व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. तसेच २ हजार ५९६ कारागिरांनी कौशल्य पडताळणी पूर्ण केली असून, त्यापैकी १ हजार ५२ कारागिरांना टूलकिटचे वाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ६३८ लाभार्थ्यांना प्रथम स्तरावरील १ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असून, त्यापैकी ४९८ कारागिरांना कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा उद्देश केवळ आर्थिक मदत करणे एवढाच नसून, देशातील पारंपरिक कला व कौशल्य जिवंत ठेवणे आणि तरुणांना स्वयंरोजगाराकडे वळविणे हा आहे. कारागिरांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून स्वतःचा उद्योग उभारावा आणि इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.
लाभार्थ्यांच्या अडचणींसाठी जिल्हास्तरीय यंत्रणा
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी म्हणाल्या की, विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी संस्थात्मक यंत्रणा उभारण्यात येईल. लाभार्थ्यांची संख्या, कर्ज वितरण, कर्जाची परतफेड तसेच लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा नियमित आढावा घेण्यासाठी दर महिन्याला आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
बँकांनी लाभार्थ्यांच्या कर्जप्रकरणांना मंजुरी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. योजनेच्या लाभाबाबत किंवा कर्जासंदर्भात कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व्हॉट्सॲपद्वारे नोंदविता येणार आहे. आगामी काळात जिल्हास्तरावर स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असून, विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे डॉ. सेठी यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे नंदनकुमार पैठणकर आणि स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक सुहास कोतकर यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना टूलकिट तसेच बँक कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रुपेश पाटील यांनी केले.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर