तृणमूल काँग्रेसचे निवडणूक चिन्ह गोठवल्याप्रकरणी राहुल गांधींची निवडणूक आयोगावर टीका
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर (हिं.स.)। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरण्यावर बंदी घालण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका केली आहे. भाजप आणि निवडणूक आयोग मिळून विरोधी पक्षां
Rahul Gandhi


नवी दिल्ली, 18 सप्टेंबर (हिं.स.)। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरण्यावर बंदी घालण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका केली आहे. भाजप आणि निवडणूक आयोग मिळून विरोधी पक्षांना कमकुवत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही लढाई केवळ ममता बॅनर्जी यांची नसून स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका इच्छिणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाची आणि मतदाराची आहे, असे त्यांनी म्हटले.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, आधी शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी) आणि आता तृणमूल काँग्रेससोबत असे घडले आहे. प्रत्येक वेळी एकच पद्धत पुन्हा पुन्हा वापरली जाते. आधी पक्षात फूट पाडली जाते आणि त्यानंतर त्याचे निवडणूक चिन्ह काढून घेतले जाते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी जनादेशाचे रक्षण करण्याची आहे. मात्र जनतेचा निर्णय बदलू इच्छिणाऱ्या शक्तींना आयोग मदत करत असल्याचे त्यांनी म्हटले.

यापूर्वी काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनीही एक्सवर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका केली होती. निवडणूक आयोग विरोधी पक्षांविरोधात कारवाई करून लोकशाही कमकुवत करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

काँग्रेसच्या मीडिया आणि प्रचार विभागाचे अध्यक्ष पवन खेरा यांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. तृणमूल काँग्रेसचे निवडणूक चिन्ह गोठवणे हा न्याय नसून निवडणूक आयोगाच्या घटनात्मक जबाबदारीपासून दूर जाणे आहे, असे त्यांनी म्हटले. पक्षाच्या बंडखोर गटाला कोणताही घटनात्मक आधार नाही आणि त्यामुळे निवडणूक चिन्हावर त्यांचा कोणताही वैध दावा होऊ शकत नाही, असा त्यांचा दावा होता.

विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसचे ‘गवतावर दोन फुले’ हे निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावाच्या वापरावर बंदी घातली आहे. पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेझीनगर विधानसभा मतदारसंघात ६ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या दोन्ही मतदारसंघांत दोन्ही गटांनी एकाच निवडणूक चिन्हावर उमेदवार उभे केले होते.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीचा पराभव झाल्यानंतर बंडखोर आमदार आणि नेत्यांनी पक्ष सोडण्यास सुरुवात केली. जूनमध्ये टीएमसीच्या ५८ आमदारांनी विधानसभेत स्वतंत्र बैठक घेतल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर बंडखोर गटाने नवीन पक्ष स्थापन करण्याचा दावा केला. जुलैमध्ये बंडखोर गटाने निवडणूक आयोगाकडे नवीन पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह आणि ध्वज देण्याची मागणी केली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आता तृणमूल काँग्रेसचे नाव आणि निवडणूक चिन्हाच्या वापरावर बंदी घालत दोन्ही गटांना नवीन नाव आणि निवडणूक चिन्हाचे पर्याय देण्यास सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande