
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर (हिं.स.)। एनपीएस वात्सल्य योजनेला दोन वर्षे पूर्ण झाली असून, देशात आतापर्यंत एकूण ४.९ लाख पेन्शन खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यांअंतर्गत व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयूएम) ४०३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए)च्या माहितीनुसार, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या एनपीएस वात्सल्य योजनेंतर्गत गेल्या दोन वर्षांत ४.९ लाख पेन्शन खाती उघडण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत व्यवस्थापनाखालील मालमत्ता ४०३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या दोन वर्षांत नोंदणी वाढविण्यासोबतच कमी वयात आर्थिक नियोजन सुरू करण्याच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला आहे. पेन्शन नियामकाने सांगितले की, ७ जानेवारी रोजी जारी करण्यात आलेले आणि २३ फेब्रुवारीपासून लागू झालेले एनपीएस वात्सल्य योजनेचे मार्गदर्शक नियम अंशदान, गुंतवणूक, पैसे काढणे आणि प्रौढ झाल्यानंतर योजनेत बदल करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करतात.
पीएफआरडीएच्या माहितीनुसार, या योजनेतील किमान अंशदानाची रक्कम कमी करून २५० रुपये करण्यात आली आहे, तर कमाल अंशदानाची कोणतीही मर्यादा नाही. तसेच अंशतः पैसे काढण्याची सुविधा दोन वेळांवरून चार वेळा करण्यात आली आहे. गुंतवणुकीचे पर्याय सुलभ करताना इक्विटीमध्ये १०० टक्क्यांपर्यंत गुंतवणुकीची परवानगी देण्यात आली आहे. नियामकाने सांगितले की, एनपीएस वात्सल्य योजनेच्या तिसऱ्या वर्षात प्रवेश करताना ही योजना देशभरातील अधिकाधिक मुले, कुटुंबे आणि समुदायांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.
पीएफआरडीएने सांगितले की, भेटवस्तू अंशदान सुविधेअंतर्गत नातेवाईक आणि मित्रदेखील मुलाच्या दीर्घकालीन आर्थिक भविष्यासाठी योगदान देऊ शकतात. केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी १८ सप्टेंबर २०२४ रोजी एनपीएस वात्सल्य योजनेची सुरुवात केली होती. ही अल्पवयीन मुलांसाठी अंशदानावर आधारित बचत आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता योजना आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule