
जळगाव, 18 सप्टेंबर (हिं.स.)। सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने अहमदाबाद–सांतरागाछी–अहमदाबाद विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीला भुसावळ येथे थांबा देण्यात आला आहे. मात्र, जळगावसारख्या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा न दिल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
०२८३३ अहमदाबाद–सांतरागाछी विशेष गाडी २२ सप्टेंबर रोजी दुपारी २.२५ वाजता अहमदाबादहून रवाना होणार असून, विविध स्थानकांवर थांबे घेत तिसऱ्या दिवशी गुरुवारी पहाटे ३.३० वाजता सांतरागाछी येथे पोहोचणार आहे. तर ०२८३४ सांतरागाछी–अहमदाबाद विशेष गाडी २० सप्टेंबर रोजी पहाटे १२.१५ वाजता सांतरागाछीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी १.५० वाजता अहमदाबाद येथे पोहोचणार आहे.
या विशेष रेल्वेला दोन्ही दिशेने आनंद, वडोदरा, भरुच, सुरत, नंदुरबार, भुसावळ, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खडगपूर या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
नंदुरबार आणि भुसावळ येथे थांबा मिळाल्याने खान्देशातील काही भागातील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. मात्र, जळगाव स्थानकावर थांबा नसल्याने जळगावहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या विशेष गाडीचा थेट लाभ मिळणार नाही. सणासुदीच्या काळात जळगाव स्थानकावरून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असल्याने या विशेष गाडीला जळगाव येथेही थांबा देण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाडीत वातानुकूलित तृतीय श्रेणी (एसी ३ टियर), शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे उपलब्ध असणार आहेत. या गाडीचे आरक्षण १८ सप्टेंबरपासून सुरू झाले असून, प्रवाशांना सर्व पीआरएस आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट आरक्षित करता येणार आहे.
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर