
अमरावती, 18 सप्टेंबर (हिं.स.)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या सार्वजनिक सेवेच्या २५ वर्षपूर्तीनिमित्त शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाची’ बडनेरा विधानसभा मतदारसंघातील जिल्हास्तरीय सुरुवात निंभा येथे करण्यात आली. आमदार रवी राणा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लोकोपयोगी मदतीचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व शेतमजुरांनी मोबाईलचे फ्लॅश लाईट सुरू करून प्रकाश प्रज्वलित केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.कार्यक्रमात महिला बचत गटांना दीड कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत धनादेशाद्वारे वितरित करण्यात आली. विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश तसेच जन्मदाखले आणि इतर आवश्यक दाखल्यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय जिल्हा परिषद निधीतून मंजूर करण्यात आलेल्या शाळेच्या नवीन खोलीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार रवी राणा यांच्या कार्यालयाच्या नियोजनातून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम पार पडला. यावेळी समाजसेवक सुनीलभाऊ राणा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, सामान्य प्रशासन विभागाचे कुलकर्णी, भातकुली गटविकास अधिकारी तृप्ती दुरुगकर, तालुका प्रमुख मंगेश पाटील इंगोले, कार्यालय सचिव उमेश ढोणे, तालुका वैद्यकीय प्रमुख डॉ. खराटे, गटशिक्षणाधिकारी माळवे, माजी सरपंच नितेश गुडदे, उपसरपंच अविनाश संनके, प्रचारक श्रीकृष्ण बैलमारे, ग्रामपंचायत सचिव धामणे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत बडनेरा मतदारसंघातील विविध भागांत सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी