
महावितरणच्या टोलवाटोलवीवर शेतकऱ्यांचा संताप
डीपी तातडीने बदलण्याची मागणी
लातूर, १८ सप्टेंबर (हिं.स.) : निसर्गाची साथ नाही आणि महावितरणच्या ‘आज-उद्या’च्या टोलवाटोलवीमुळे खडक-उमरगा येथील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. येथील ‘कदम डीपी’ जळून तब्बल महिनाभराचा कालावधी उलटला, तरी अद्याप वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आलेला नाही. वायरमन तसेच अभियंत्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळत असल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे.
पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील पिके करपू लागली आहेत. बोअरवेलमध्ये थोडेफार पाणी उपलब्ध असतानाही वीजपुरवठा नसल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. डोळ्यांदेखत हाताशी आलेले पीक वाळत असल्याने शेतकऱ्यांवर मोठ्या आर्थिक नुकसानीचे संकट ओढवले आहे. त्याचबरोबर शेतातील गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.जळालेली डीपी तातडीने दुरुस्त अथवा बदलून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांपासून स्थानिक अभियंत्यांपर्यंत वारंवार विनंती करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.‘वीज बिल वसुलीसाठी तत्पर असलेली यंत्रणा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महिनाभर का हलत नाही?’ असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, जळालेली ‘कदम डीपी’ तातडीने बदलून वीजपुरवठा सुरू न केल्यास महावितरण कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. परिस्थिती आणखी चिघळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis