
लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील गणेशोत्सव आनंदी, सुरक्षित आणि निर्विघ्न पार पडावा, यासाठी उदगीर नगरपरिषदेने प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. मुख्याधिकारी दीपक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन उत्सव काळातील व्यवस्थेबाबत जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या.
मिरवणूक व विसर्जन मार्गावरील रस्त्यांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या. विद्युत विभागाने पथदिवे, विशेषतः मिरवणूक व विसर्जन मार्गावरील प्रकाशव्यवस्था तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कार्यक्षमता तपासण्याचे निर्देश देण्यात आले.विसर्जनस्थळ व परिसरात स्वच्छता कायम ठेवण्यासह विसर्जन विहीर आणि संबंधित ठिकाणची पूर्वतयारी पूर्ण करण्याच्या सूचना स्वच्छता विभागाला देण्यात आल्या. नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश मुख्याधिकारी मोरे यांनी दिले.
घरगुती गणपती संकलनासाठी नगरपरिषदेने पाच ट्रॅक्टरची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. नागरिकांनी शक्यतो पर्यावरणपूरक पद्धतीने घरीच विसर्जन करावे किंवा नगरपरिषदेच्या संकलन व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात सुरक्षितता, स्वच्छता, वाहतूक आणि मूलभूतसुविधांचा समन्वय साधण्यासाठी नगरपरिषद प्रशासन सज्ज असल्याचे मुख्याधिकारी मोरे यांनी सांगितले. बैठकीस आरोग्य व स्वच्छता सभापती राजकुमार हुडगे, उपमुख्याधिकारी विठ्ठल भंडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख व संबंधित उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis