‘सा रे ग म प 2026’चा सुरेल प्रवास 19 सप्टेंबरपासून
शंकर महादेवन, कुमार सानू, नीति मोहन आणि जावेद अली गुरुंच्या भूमिकेत; श्रेयस तळपदे करणार सूत्रसंचालन मुंबई, 18 सप्टेंबर (हिं.स.) : संगीतप्रेमींच्या मनावर गेल्या तीन दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या ‘सा रे ग म प’ या लोकप्रिय गायन रिअॅलिटी शोच्य
झी टीव्हीवरील ‘सा रे ग म प’ आपल्या नवीन भव्य पर्वासह पुन्हा भेटीला; हिंदी झी5 वरही होणार प्रसारण


शंकर महादेवन, कुमार सानू, नीति मोहन आणि जावेद अली गुरुंच्या भूमिकेत; श्रेयस तळपदे करणार सूत्रसंचालन

मुंबई, 18 सप्टेंबर (हिं.स.) : संगीतप्रेमींच्या मनावर गेल्या तीन दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या ‘सा रे ग म प’ या लोकप्रिय गायन रिअॅलिटी शोच्या नव्या पर्वाची घोषणा झी टीव्हीने मुंबईत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत केली. ‘हिंदुस्तान का संगीतस्थान’ या संकल्पनेवर आधारित ‘सा रे ग म प 2026’चा प्रीमियर 19 सप्टेंबर 2026 रोजी होणार असून, दर शनिवार आणि रविवारी रात्री 9.30 वाजता झी टीव्ही तसेच हिंदी झी5वर हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे.

यंदाच्या पर्वात पारंपरिक गायन स्पर्धेपलीकडे जाऊन प्रेक्षकांना भव्य संगीताचा अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 360 अंशांचा नेत्रदीपक मंच, 100 हून अधिक संगीतकार आणि विशाल कोरस समूहाच्या सहभागामुळे कार्यक्रमाला थेट संगीत मैफलीचे स्वरूप प्राप्त होणार आहे. अत्याधुनिक व्हर्च्युअल रिऍॅलिटीच्या माध्यमातून या नव्या पर्वाच्या भव्य सेटची झलकही पत्रकार परिषदेत दाखवण्यात आली.

भारतीय संगीताची विविधता, समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यंदाच्या पर्वाच्या केंद्रस्थानी असणार आहे. देशाच्या विविध भागांतील संगीत परंपरांचा सुरेल संगम सादरीकरणातून अनुभवायला मिळणार असून, नवोदित गायकांना आपल्या प्रतिभेला वाव देण्याची संधी मिळणार आहे.

या पर्वाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे संगीतविश्वातील चार दिग्गज गुरुंचा सहभाग. शंकर महादेवन, कुमार सानू, नीति मोहन आणि जावेद अली हे स्पर्धकांना मार्गदर्शन करणार आहेत. विविध संगीतप्रकारांतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव स्पर्धकांना मिळणार असून, सादरीकरणांसोबतच त्यांच्या संगीतप्रवासातील अनुभव आणि ज्ञानाचा लाभही स्पर्धकांना होणार आहे. अभिनेता श्रेयस तळपदे या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे मुख्य कंटेंट अधिकारी राघवेंद्र हुन्सूर यांनी सांगितले की, ‘सा रे ग म प’ ही झीची जवळपास तीन दशकांपासून असलेली विश्वासार्ह मालिका असून, अस्सल संगीत आणि गायक प्रतिभेला व्यासपीठ देणे ही तिची ओळख आहे. यंदाच्या पर्वात केवळ आणखी एक गायन रिअॅलिटी शो सादर करण्याऐवजी संगीताला केंद्रस्थानी ठेवून एक स्वतंत्र विश्व उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारतीय संगीताची समृद्ध परंपरा, विविधता आणि संगीतकौशल्याला यामध्ये विशेष स्थान देण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.

झी टीव्हीचे मुख्य चॅनल अधिकारी मंगेश कुलकर्णी यांनीही नव्या पर्वाबद्दल उत्साह व्यक्त केला. ‘सा रे ग म प’चा आत्मा आणि ओळख कायम ठेवत त्याला नव्या भव्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भव्य मंच, लाइव्ह कॉन्सर्टचा अनुभव, 100 हून अधिक संगीतकारांचा सहभाग आणि दिग्गज संगीतगुरूंचे मार्गदर्शन यामुळे प्रेक्षकांना वेगळा संगीतानुभव मिळेल, असे त्यांनी सांगितले.

‘हिंदुस्तान का संगीतस्थान’ या संकल्पनेत कलाकार, संगीतकार आणि संगीताला केंद्रस्थानी ठेवण्यात आले असून, भारतीय संगीताच्या वैभवाचा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न या पर्वातून केला जाणार आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande