
कोल्हापूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसीय कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. हुबळी येथील दौरा आटोपल्यानंतर अमित शाह कोल्हापूरला येणार होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी हुबळीहून थेट दिल्ली गाठली. त्यामुळे कोल्हापूरमधील नियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.
हुबळी येथे केएलई सोसायटीच्या वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राच्या उद्घाटनासाठी अमित शाह उपस्थित राहणार होते. काल डेनिसन्स हॉटेलमध्ये मुक्काम केल्यानंतर आज सकाळी ते उद्घाटन समारंभाला जाणार होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने त्यांनी हॉटेलमध्येच विश्रांती घेतली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, खासदार बसवराज बोम्मई तसेच माजी मंत्री मुरुगेश निराणी, सी. सी. पाटील, इराण्णा कडाडी, अभय पाटील आणि रमेश कट्टी यांनी उद्घाटन समारंभाला जाण्यापूर्वी हॉटेलवर जाऊन अमित शाह यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
दरम्यान, अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील ६०० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. प्रकाश आवाडे यांच्या कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर या प्रकल्पाची पायाभरणी होणार होती. शून्य कचरा संकल्पनेवर आधारित साखरेवर प्रक्रिया करणारा हा देशातील पहिला बहुराज्य सहकार तत्त्वावरील प्रकल्प असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ६०० कोटी रुपये आहे. केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शाह यांनी जून महिन्यात इचलकरंजी येथील कार्यक्रमात या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी प्रकल्पासाठी जागेचा शोध घेण्यासाठी विशेष पथक पाठवले होते. या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागातील विविध साखर कारखान्यांच्या जागांची पाहणी केली. तांत्रिक पाहणीनंतर जवाहर कारखान्याची जागा निश्चित करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule