
बीड, 19 सप्टेंबर (हिं.स.)। सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा वापर करताना विद्यार्थ्यांनी सतर्क व जबाबदार राहणे आवश्यक आहे. चेष्टा-मस्करी अथवा गंमत म्हणूनही आक्षेपार्ह मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलीस उपनिरीक्षक निलेश केळे यांनी दिला.
आदित्य शिक्षण संस्था संचलित आदित्य कृषी महाविद्यालयातील 'एकदंत गणेश' मंडळाच्या आरतीनंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी ऑनलाइन फसवणूक, एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि सायबर गुन्ह्यांपासून बचावाबाबत
मार्गदर्शन केले. सोशल मीडिया व एआयचा वापर शैक्षणिक आणि सकारात्मक कामांसाठी करावा. अनोळखी लिंक,संशयास्पद मेसेज, बनावट कॉल किंवा आमिषांना बळी पडू नये. वैयक्तिक माहिती, बँक तपशील आणि ओटीपी कोणासोबतही शेअर करू नये, असे आवाहन त्यांनी केले. डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासाठी 'सतर्कता, सुरक्षितता आणि जबाबदारी' या त्रिसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, केळे यांनी संस्थेच्या शैक्षणिक परिसराचे तसेच विद्यार्थ्यांनी साकारलेल्या सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis