नागोठणे-पोयनाड मार्गावर चिखलाचे साम्राज्य; अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका
रिलायन्सच्या नवीन प्रकल्पाच्या कामामुळे वाहतूक कोंडी; रस्त्यावरच अवजड वाहनांचे पार्किंग रायगड, 19 सप्टेंबर (हिं.स.) : नागोठणे परिसरातील रिलायन्स कंपनीच्या नवीन प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामामुळे नागोठणे-पोयनाड मार्गावरील स्थानिक नागरिक, प्रवासी आ
Mud and traffic jams on the Nagothane-Poynad route; administration turns a blind eye!


रिलायन्सच्या नवीन प्रकल्पाच्या कामामुळे वाहतूक कोंडी; रस्त्यावरच अवजड वाहनांचे पार्किंग

रायगड, 19 सप्टेंबर (हिं.स.) : नागोठणे परिसरातील रिलायन्स कंपनीच्या नवीन प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामामुळे नागोठणे-पोयनाड मार्गावरील स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल साचत असून, रस्ता निसरडा झाल्याने दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रकल्पाच्या कामासाठी ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्यावर चिखल पसरत असल्याने वाहतुकीसाठी परिस्थिती धोकादायक बनली आहे. चिखलामुळे दुचाकी घसरण्याच्या घटना घडत असून, लहान-मोठे अपघात होत असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांना पायी चालतानाही अडचणी येत असून, धूळ आणि चिखलामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्यावरच अवजड वाहने

प्रकल्पासाठी येणाऱ्या डंपर, ट्रक आणि अन्य अवजड वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने ही वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर अवजड वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या वाढत आहे.विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

प्रशासनाच्या हस्तक्षेपाची मागणी

या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढली असून, संबंधित प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने परिस्थितीची पाहणी करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. रस्त्यावर साचलेला चिखल तातडीने हटवावा, अव्यवस्थितपणे उभी करण्यात येणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करावी तसेच प्रकल्पासाठी येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित पार्किंग व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande