डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणी पती डॉ.नीलेश जेजुरकर अटकेत
नाशिक, 19 सप्टेंबर (हिं.स.)। - येथील प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यू प्रकरणात अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाचा प्रमुख डॉ. नीलेश दत्तात्रय जेजूरकर याला पत्नी डॉ. मनीषा
डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणी पती डॉ.नीलेश जेजुरकर अटकेत


नाशिक, 19 सप्टेंबर (हिं.स.)।

- येथील प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यू प्रकरणात अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाचा प्रमुख डॉ. नीलेश दत्तात्रय जेजूरकर याला पत्नी डॉ. मनीषा हिला जीव देण्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अखेर अटक करण्यात आली आहे. नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकने ही कारवाई केली आहे.

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेला त्यांचा पती आणि नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश दत्तात्रय जेजुरकर याला शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 ने शुक्रवारी, 18 सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. द्वारका सर्कल परिसरातून पोलिसांनी ही कारवाई केली.

डॉ. मनीषा जेजुरकर (वय 40) यांचा 6 मार्च 2026 रोजी गंगापूर रोडवरील डी. के. नगर परिसरातील रेवती ब्ल्यू अपार्टमेंटमधील राहत्या घरी मृत्यू झाला होता. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर मनीषा यांच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनंतर डॉ. नीलेश जेजुरकर यांच्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणानंतर डॉ. नीलेश जेजुरकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयीन लढाई सुरू केली होती. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयातूनही त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला. 17 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती समोर आली. त्यामुळे तपास यंत्रणेसमोर हजर होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

मात्र, न्यायालयीन आदेशानंतरही डॉ. नीलेश जेजुरकर पोलिसांसमोर शरण आले नाहीत. त्यानंतर नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 ने त्यांचा शोध घेतला आणि अखेर द्वारका सर्कल परिसरातून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी सुरू केली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande