
अमरावती, 19 सप्टेंबर (हिं.स.)। पावसाचा खंड व सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान असल्याने जिल्ह्यातील आठ तालुक्यांत दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू झाला आहे. तथापि दुष्काळ जाहीर होण्यासाठी दुसऱ्या ट्रिगरमधील निकष तपासण्यात येणार असून त्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंतच्या पावसाची सरासरी हा मुख्य निकष राहणार आहे. विशेष म्हणजे तिवसा तालुका या मधून वगळण्यात आला आहे.
पावसाची सद्यस्थिती बघता या महिन्यात सरासरी इतका पाऊस बरसण्याची शक्यता कमी असल्याने एखाद दुसरा तालुका वगळता जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदा मानसून विलंबाने येण्यासोबतच त्याचे प्रमाण असमतोल राहिले आहे. जुलै महिन्यात बऱ्यापैकी बरसलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये दिर्घ खंड दिला आहे. २२ दिवसांचा खंड या महिन्यात राहिला असून दुष्काळाच्या पहिल्या निकषात आठ तालुके आले आहेत. दरम्यान, दुष्काळाचा पहिला ट्रीगर लागू झाला असला तरी तो साधारणतः सप्टेंबर अखेरपर्यंतचा मोजण्यात येतो.
दुष्काळ जाहीर करण्यासाठी दुसऱ्या ट्रिगरमधील निकष लागू होणे आवश्यक आहे. त्याची तपासणी सॅटेलाईट बेस असून ती तपासण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. सप्टेंबरअखेर एकूण पावसाच्या तुलनेत ७५ टक्क्यांपेक्षा कमी सरासरी आल्यास दुष्काळ जाहीर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण बघता व अंदाज लक्षात घेता ७५ टक्क्यांची सरासरी गाठणे अशक्य दिसत आहे. जिल्ह्यात १ जून ते १८ सप्टेंबर या कालावधीत ५९ टक्के पाऊस झाला आहे. निम्मा सप्टेंबर झाला असून उर्वरित १२ दिवसांत ४१ टक्के तूट भरून निघण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक दोन तालुके वगळता उर्वरित तालुके दुष्काळाच्या सावटात आले आहेत.
१२० पैकी ३६ दिवस पाऊस
पावसाच्या १२० दिवसांपैकी ३६ दिवसच पाऊस झाला असून १ जून ते १८ सप्टेंबर या कालावधीत ४७२ मी.मी. अर्थात ५९ टक्के पाऊस झाला आहे. बावीस दिवसांपेक्षा अधिकचा पावसाचा खंड असून दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू झाला आहे.
सरासरी पाऊस
जून : ९ दिवस
जुलै : १९ दिवस
ऑगस्ट : ६ दिवस
सप्टेंबर ( १८ पर्यंत) : २ दिवस
हे तालुके संकटात अचलपूर, अंजनगावसुर्जी, भातकुली, चांदूर बाजार, चिखलदरा, धारणी, मोर्शी व वरूड या आठ तालुक्यात दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू करण्यात आला आहे. हा ट्रिगर ऑगस्ट अखेरच्या पावसाच्या सरासरी व खंडावर लागू करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी