
नाशिक, 19 सप्टेंबर (हिं.स.) : सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथील एचपी गॅस परिसरात वन्यजीवाच्या संभाव्य वावराच्या पार्श्वभूमीवर वन विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून, परिसराची सातत्याने पाहणी केली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरात तीन पिंजरे बसविण्यात आले असून, सामान्य ड्रोन तसेच थर्मल ड्रोनच्या माध्यमातून दिवसा आणि रात्री परिसराची पाहणी करण्यात आली आहे.
१४ सप्टेंबर रोजी सिन्नर वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी आणि सुरक्षा प्रभारी वाघुळे यांनी परिसराची पाहणी करून दोन पिंजरे बसविले. यावेळी वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
१५ सप्टेंबर रोजी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बडगुजर यांच्या समवेत संपूर्ण परिसराची पुन्हा पाहणी करण्यात आली. नागरिकांच्या मागणीनुसार आणखी एक पिंजरा बसविण्यात आला.
१६ सप्टेंबर रोजी सहाय्यक वनसंरक्षकांच्या उपस्थितीत परिसराची दिवसा तसेच रात्री पाहणी करण्यात आली. यासाठी सामान्य ड्रोनसोबत थर्मल ड्रोनचाही वापर करण्यात आला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमच्या परिसराची विशेष तपासणी करून तेथे बछड्यांची उपस्थिती आहे का, याची पडताळणी करण्यात आली.
१७ आणि १८ सप्टेंबर रोजी परिसरातील कुंपणाचे काम करण्यात आले. या कामात वन विभागाचे कर्मचारी तसेच एचपी कंपनीचे कर्मचारी सहभागी झाले.
दरम्यान, वन्यजीव-मानव संघर्षाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नाशिक टीटीसी केंद्राच्या ‘इको-इको’ संस्थेच्या माध्यमातून २१ सप्टेंबर रोजी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
वन्यजीव आढळल्यास नागरिकांनी त्याच्या जवळ जाऊ नये किंवा त्याला त्रास देऊ नये. वन्यजीव दिसल्यास तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI