
मुंबई, 19 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि प्रत्येकाच्या भावविश्वाशी जोडलेला सण आहे. बाप्पाला घराची आरास, मोदकांचा गोडवा, आरती-भजनांचा आनंद आणि कुटुंबीयांसोबत घालवलेले क्षण यामुळे हा सण प्रत्येकासाठी खास असतो. प्रत्येक घरात गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत वेगळी असली, तरी बाप्पाशी जोडलेली भावना मात्र तितकीच जिव्हाळ्याची असते. झी मराठीवरील कलाकारांनीही त्यांच्या घरच्या गणेशोत्सवाच्या परंपरा, बाप्पाशी जोडलेल्या आठवणी आणि या सणाविषयीच्या भावना सांगितल्या आहेत.
रोहित परशुराम – शंकर, ‘कृष्णाईच्या लेकी’
रोहित परशुराम यांच्यासाठी यंदाचा गणेशोत्सव त्यांच्या तीन वर्षांच्या मुलगी रुईमुळे आणखी खास आहे. बाप्पाच्या आगमनाची तयारी रुईने स्वतःहून सुरू केली असून, बाप्पाशी तिची ओळख होऊ लागल्याचा आनंद रोहित यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर दगडूशेठ गणपतीशी जोडलेला एक खास अनुभवही त्यांनी सांगितला. “माझी मुलगी रुई आता तीन वर्षांची झाली आहे आणि तिला सगळं कळायला लागलंय. त्यामुळे यावर्षी तिने घरी एका कार्डबोर्डवर क्ले, फुलं आणि वेगवेगळ्या गोष्टी चिकटवून बाप्पाचं डेकोरेशन १५ दिवस आधीच तयार केलं आहे. बाप्पा येणार आहेत आणि त्यांच्यासमोर मला डेकोरेशन ठेवायचं आहे, हे तिनेच ठरवलंय. यावर्षीपासून तिला बाप्पा कळायला लागले आहेत, त्यामुळे हे आमच्यासाठी खूप खास आहे. काही महिन्यांपूर्वी माझे सख्खे काका वारले. त्यामुळे यावेळी बाप्पाचा उत्सव फार मोठा नसेल, पण छान आणि मनापासून साजरा करणार आहे.
आमचा गणपती वर्षानुवर्षे भोरला येतो. तिथे माझे आई-वडील असतात. मी, माझं कुटुंब आणि माझ्या दादाचं कुटुंब असे सगळे मिळून तिथे गणेशोत्सव साजरा करतो. दगडूशेठ गणपती आणि माझं खूप खास नातं आहे, असं मी म्हणेन; कारण मला त्याचा तसा अनुभवही आला आहे. २०१९ च्या मार्चमध्ये मी पुण्यातली माझी जिम बंद करून पूर्ण लक्ष अभिनयाकडे द्यायचं ठरवलं. त्यावेळी मला जिमची जागा एका आठवड्यात रिकामी करून द्यायची होती. जिममध्ये जवळपास ५-६ लाख रुपयांचं साहित्य होतं. ते मला विकून टाकायचं होतं, कारण ते तिथून काढून दुसरीकडे ठेवणं शक्य नव्हतं. भोरला पाठवायचं म्हटलं असतं, तरी खूप खर्च झाला असता. मी त्यासाठी जाहिरातही टाकली होती आणि माझं ॲग्रीमेंटही संपलेलं होतं. जागेच्या मालकाशी माझं चांगलं नातं होतं, तेही मला सांभाळायचं होतं. सगळं एकदम अडचणीचं झालं होतं.
त्या वेळी मला मुंबईला शिफ्ट व्हायचं होतं आणि अभिनय क्षेत्रासाठी ते मी आधीच ठरवलं होतं. मला काहीच मार्ग सुचत नव्हता. पुण्यात असताना मी दर मंगळवारी किंवा जमेल तसं चतुर्थीला पूजा आणि मी दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला जायचो. त्यावेळी पूजाने मला सुचवलं की, ‘एकदा फक्त बाप्पाला सांगून बघ. फक्त दर्शन घेऊन ये.’ मी तिचं ऐकलं. दर्शन घेतलं आणि चौकात बसलो. बाप्पाकडे बघताना अचानक माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी बाप्पाकडे एकच गोष्ट मागितली, ‘मला यातून बाहेर काढ.’ त्यानंतर चक्क चौथ्या दिवशी माझं जिमचं सगळं साहित्य विकलं गेलं. त्या तीन-चार दिवसांत जणू चमत्कारच झाला, असं मी म्हणेन. माझ्याच जिमचा एक विद्यार्थी होता. तो सासवडला जिम सुरू करणार होता आणि त्यानेच माझ्याकडून सगळं साहित्य विकत घेतलं. त्यानंतरच्या मंगळवारी मी पुन्हा बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाप्पाचे खूप खूप आभार मानले.”
प्राप्ती रेडकर – सावली, ‘सावळ्याची जणू सावली’
कोकणातील मालवणच्या वैंगणी गावाशी जोडलेल्या प्राप्ती रेडकर यांच्यासाठी गणेशोत्सव म्हणजे कुटुंबासोबतचा आनंद, भजनाची मैफल आणि गावच्या परंपरांचा अनुभव. बाप्पाच्या पूजेपासून मुंबईतील सार्वजनिक गणपतींच्या दर्शनापर्यंतच्या त्यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. “मी कोकणातली आहे. माझं गाव मालवणमधलं वैंगणी आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवासाठी मी गावी जाणार आहे. आमच्याकडे ११ दिवसांचा गणेशोत्सव असतो. मला सगळे दिवस गावी राहणं शक्य होत नाही, त्यामुळे मी गणेशोत्सवासाठी साधारण ५-६ दिवस गावी असते. यावर्षी मी आमच्या बाप्पासाठी ‘रेडकरांचा बाप्पा’ अशी नेमप्लेट बनवायला दिली आहे. ती बाप्पासाठी माझ्याकडून खास असेल. गावी गणपतीला खूप मजा असते. रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे एकत्र भजन करतो. माझे काका सचिन रेडकर भजनी बुवा असल्यामुळे आमच्याकडे भरपूर धमाल असते.
माझे बाबा सुद्धा गायक आहेत. त्यामुळे सगळं कुटुंब, भावंडं मिळून भजनाचं भन्नाट जॅमिंग करतो. गणेशोत्सव म्हटलं की माझ्या मनात सुंदर बाप्पा आणि गोड गोड मोदक येतात. गावी गणपतीला गेल्यावर आमच्याकडे एक पद्धत आहे. आंघोळ झाल्यानंतर बाप्पासाठी अंगणातून किंवा रानातून ताज्या दुर्वा आणायच्या असतात. आम्ही त्याला ‘परडा’ म्हणतो. त्यात दुर्वांसोबत शमीची पानंही आणतो. त्यानंतर बाप्पाच्या पूजेची तयारी करतो. आरती करणं मला खूप आवडतं. मुंबईतल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठीही मी आतुर असते. गावावरून आल्यावर सगळ्यात आधी डोंगरीचा राजा आणि उमरखाडीचा राजा यांचं दर्शन घेते. त्यानंतर चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा, परळचा राजा आणि अजून बऱ्याच मोठ्या गणपतींचं दर्शन घेणार आहे. बाप्पाच्या दर्शनाने मला खूप सकारात्मक वाटतं. बाप्पा नेहमीच आपल्या सगळ्यांना कठीण प्रसंगातून बाहेर काढतो, कारण तो विघ्नहर्ता आहे. माझ्या आयुष्यात, माझ्या कुटुंबीयांच्या आयुष्यात आणि सगळ्यांच्याच आयुष्यात आलेल्या संकटांतून बाप्पाने बाहेर काढलं आहे, असं मी मानते. बाप्पा माझ्या आयुष्यात खूपच स्पेशल आहे. एवढं की ते शब्दांत सांगणं कठीण आहे.”
शिवानी सोनार – तारिणी, ‘तारिणी’
पुण्यात वाढलेल्या शिवानी सोनार यांच्यासाठी गणेशोत्सव हा सर्वात आवडता सण असून, माहेर आणि सासर अशा दोन्ही घरांतील गणपतीशी त्यांच्या खास आठवणी जोडलेल्या आहेत. बाप्पाची मूर्ती निवडण्याची परंपरा, पुण्यातील मानाच्या गणपतींचं दर्शन आणि यंदा सासूबाईंकडून उकडीचे मोदक शिकण्याची त्यांची इच्छा त्यांनी सांगितली. “माझ्या माहेरी आणि सासरी अशा दोन्ही ठिकाणी गणपती असतो. माहेरी १० दिवसांचा आणि सासरी दीड दिवसांचा गणपती असतो. गणेशोत्सव हा माझ्या सर्व सणांमधला अतिशय लाडका आणि आवडता सण आहे. मी पुण्याची असल्यामुळे मी एक नियम केला आहे की, मानाच्या पाच गणपतींचं दर्शन नक्की घ्यायचं. जसा वेळ मिळेल तसं मी जाते आणि पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींचं दर्शन घेतेच. बाप्पासाठी आरास आणि डेकोरेशन करायला मला पूर्वीपासूनच आवडतं. पण सध्या शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. मात्र कोणाला काही आयडिया देणं किंवा ऑनलाइन शॉपिंग करणं, हे माझं काम सुरूच असतं.
माझ्या माहेरी आमच्या बाप्पाची मूर्ती कायम मीच निवडते. आता ती एक परंपराच झाली आहे आणि माझ्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं काम आहे. गणपतीच्या काळात मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा मी माझ्या आजूबाजूच्या परिसरात गणपतीच्या मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांचे स्टॉल्स आवर्जून पाहते. वेगवेगळ्या मूर्तीकारांच्या स्टॉलवर जाऊन मूर्ती बघायला मला फार आवडतं. प्रत्येक मूर्ती वेगळी असते. बाप्पाचे हावभाव, त्यांची ठेवण, रूपरंग सगळं निरखायला मला प्रचंड आवडतं. दरवर्षी मी मोदक करतेच; पण यावर्षी सुबक-सुरेख उकडीचे मोदक करायचं मी ठरवलं आहे. तळणीचे मोदक मला जमतात, पण उकडीचे मोदक अजूनही मला फारसे चांगले जमत नाहीत. ते मला शिकायचे आहेत आणि यावर्षी मी माझ्या सासूबाईंकडून ते शिकून घेणार आहे.”
बाप्पाच्या आगमनाची तयारी करताना मुलीचा उत्साह पाहण्यापासून ते गावच्या भजनाच्या मैफलीपर्यंत, संकटातून मार्ग मिळाल्याची आठवण असो किंवा घरच्या बाप्पाची मूर्ती निवडण्याची परंपरा प्रत्येक कलाकाराच्या गणेशोत्सवाच्या आठवणी वेगळ्या आहेत. मात्र या सगळ्या आठवणींमध्ये कुटुंब, परंपरा, आनंद आणि बाप्पावरील श्रद्धा यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. यंदाचा गणेशोत्सवही अशाच आनंददायी क्षणांनी आणि बाप्पाच्या आशीर्वादाने भरलेला असावा, हीच या कलाकारांची भावना आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule