
अमरावती, 19 सप्टेंबर (हिं.स.) | शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रवी राणा यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत तूर, कापूस आणि सोयाबीन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतातील पिकांची स्थिती जाणून घेत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. सध्या पिके जोमात दिसत असली तरी पावसाने दडी मारल्याने पुढील काळात पिकांना पाण्याची नितांत गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर काही भागात पावसाने ओढ दिल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. तूर, कापूस आणि सोयाबीन ही प्रमुख पिके असून, त्यांना सध्या पुरेशा पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या चिंता रवी राणा यांच्या पाहणीदरम्यानही प्रकर्षाने जाणवल्या.
पाहणी दरम्यान रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. पिके चांगली येत असली तरी त्यांना जगविण्यासाठी वेळेत पाऊस पडणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी राणा यांनी शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी गणपती बाप्पा, महालक्ष्मी माता आणि वरुणराजाकडे प्रार्थना केली. “माझा शेतकरी आणि शेतमजूर राजा सुखी-समृद्ध व्हावा. संकटात सापडलेल्या शेतकरी-शेतमजुरांना दिलासा मिळावा आणि लवकरच जोरदार पाऊस पडावा,” अशी कळकळीची भावना त्यांनी व्यक्त केली. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी