बोरपाडा येथे ‘लोकसंवाद-2026’ अभियान उत्साहात
नंदुरबार, 19 सप्टेंबर (हिं.स.) : शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष जनजागृती अभियानांतर्गत नवापूर तालुक्यातील बोरप
अभियान उत्साहात


नंदुरबार, 19 सप्टेंबर (हिं.स.) : शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष जनजागृती अभियानांतर्गत नवापूर तालुक्यातील बोरपाडा येथे कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पात्र नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

‘लोकसंवाद-२०२६’ आणि ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत आयोजित या कार्यक्रमाला दापूरचे सरपंच जयराम कुवर, बोरपाड्याचे उपसरपंच काशिराम गावित, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश वसावे, उपकृषी अधिकारी राहुल शिरसाट, ग्रामविकास अधिकारी गणेश गावित, ग्राम महसूल अधिकारी भाईदास पावरा, पोलीस पाटील ओरस गावित, ग्रामरोजगार सहायक योसेफ गावित यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश वसावे यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या शबरी आवास घरकुल योजना, न्यूक्लिअस बजेट आणि ठक्कर बाप्पा पायाभूत सुविधा योजनेची माहिती दिली.

ग्रामविकास अधिकारी गणेश गावित यांनी १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प’ अभियानाची तसेच १६ ते २४ सप्टेंबरदरम्यानच्या ‘लोकसंवाद-२०२६’ अभियानाची माहिती दिली. ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना, विकसित भारत रोजगार व आजीविका योजना (व्हीबी-जी राम जी), स्वच्छ भारत मिशन आणि जलजीवन मिशन याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

उपकृषी अधिकारी राहुल शिरसाट यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. फळबाग लागवड, महाडीबीटीअंतर्गत कृषी योजना, कृषी यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म सिंचन योजना, ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि ई-पीक नोंदणी कशी करावी, याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

ग्राम महसूल अधिकारी भाईदास पावरा यांनी सातबारा उताऱ्यावरील नाव कमी करणे, संजय गांधी योजना, सातबारा नाव दुरुस्ती तसेच सातबारा उताऱ्यावर नावे नोंदविण्याची प्रक्रिया यासह महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी कृषी, महसूल, ग्रामविकास आणि आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती देतानाच पात्र नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

उपसंपादक संदीप गावित यांनी ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाला ग्रामस्थ, शेतकरी आणि नागरिकांची उपस्थिती होती.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande