जालना जिल्ह्यातील पीक परिस्थिती गंभीर
सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदतीची मागणी छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.) : “संकटात सापडलेल्या बळीराजाच्या पाठीशी उभे राहणे हीच आपली जबाबदारी आहे,” असे आमदार नारायण कुचे यांनी म्हटले. छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील पीक परिस्थि
अ


सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदतीची मागणी

छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.) : “संकटात सापडलेल्या बळीराजाच्या पाठीशी उभे राहणे हीच आपली जबाबदारी आहे,” असे आमदार नारायण कुचे यांनी म्हटले. छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते ऑनलाइन सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी, पीक परिस्थिती आणि विविध समस्या कृषिमंत्र्यांसमोर मांडल्या.

जालना जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आमदार कुचे यांनी बैठकीत सांगितले. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर यांसह विविध पिकांना तसेच फळबागांना फटका बसला आहे. खरीप हंगामावर परिणाम झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत असून, आगामी रब्बी हंगामाबाबतही चिंता निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर बैठकीत सरसकट पीक पंचनामे तातडीने करण्याची मागणी करण्यात आली. तसेच २०२४-२५ मधील आंबेमोहर पीक विम्याचे नाकारलेले दावे पुन्हा तपासून नव्याने अहवाल मागवावा आणि पात्र शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याच्या समस्येचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. पावसाने ओढ दिल्याने सिंचनासाठी विहिरी, विंधन विहिरी आणि अन्य साधनांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा मिळणे आवश्यक असल्याचे कुचे यांनी सांगितले. कृषी पंपांसाठीचे भारनियमन कमी करून किंवा थांबवून नियमित आणि पुरेशा कालावधीचा वीजपुरवठा करावा, तसेच अनियोजित वीजखंडित होण्याचे प्रकार थांबवावेत, अशी मागणी त्यांनी केली.

खरीप पिकांचे नुकसान आणि आगामी रब्बी हंगामावरील संकट लक्षात घेऊन तातडीने दुष्काळी उपाययोजना सुरू कराव्यात, तसेच प्रशासनाने गावागावांत प्रत्यक्ष पाहणी करून पीक परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.

संकटाच्या काळात शेतकऱ्यांना केवळ आश्वासन नव्हे, तर तातडीची आणि प्रत्यक्ष मदत मिळणे गरजेचे आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात, अशी मागणी आमदार नारायण कुचे यांनी केली.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande