
वर्धा, 19 सप्टेंबर (हिं.स.)
हिंगणघाट शहरातील प्रमुख मार्ग, चौक तसेच विविध प्रभागांमध्ये मोकाट श्वान, गायी, वळू व इतर मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मोकाट श्वान व जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. शहरातील रस्त्यांवर अचानक येणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येमुळे विशेषतः लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर परिषदेने यापूर्वी मोकाट श्वान व बेवारस जनावरांच्या बंदोबस्तासाठी नियोजन व ठराव केले असल्यास त्याची प्रभावी अंमलबजावणी प्रत्यक्षात दिसून आली नाही. केवळ कागदोपत्री नियोजन न करता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्यक्ष आणि सातत्यपूर्ण कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. शहरातील सर्व प्रमुख मार्ग, चौक व प्रभागांमध्ये सर्वेक्षण करून मोकाट श्वानांची पकड मोहीम, निर्बीजिकरण व लसीकरण करण्यात यावे. मोकाट गायी, वळू व इतर जनावरांसाठी नियमानुसार पकड मोहीम राबवून त्यांची सुरक्षित व्यवस्था करण्यात यावी. तसेच शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, मंदिर परिसर व नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी विशेष पथक नियुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र संपर्क क्रमांक उपलब्ध करून तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी आणि यापूर्वी करण्यात आलेल्या ठराव व नियोजनाच्या अंमलबजावणीची माहिती सार्वजनिक करावी, अशीही मागणी करण्यात आली. या विषयावर प्रशासनाकडून योग्य कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देताना सारिका अनासाने, नगरसेविका राजश्री देवडे, माजी नगरसेविका नीता धोबे, करुणा वाटकर, सचिन पोटदुखे, सुनील आष्टीकर, शीतल चौधरी, दिलीप चौधरी, प्रमोद एडलावर, दिनेश धोबे, हिरामण आवारी, पप्पू घवघवे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी