
आरोग्य उपसंचालकांकडून पाहणी
वर्धा, 19 सप्टेंबर (हिं.स.) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, दहेगाव गोसावी येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय समग्र प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण सत्राची नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत प्रशिक्षणाची माहिती जाणून घेतली.
उपसंचालक डॉ. शंभरकर यांनी प्रशिक्षण सत्रातील विविध विषयांचे सादरीकरण, प्रशिक्षणाची पद्धत तसेच प्रशिक्षणार्थींचा सहभाग याबाबत माहिती घेतली. समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (सीपीएचसी) अंतर्गत नागरिकांना अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात प्रभावीपणे वापरावे, असे आवाहन त्यांनी प्रशिक्षणार्थींना केले.
यावेळी त्यांनी प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षण सत्राची पाहणी केली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजसिंह पवार यांच्यासह प्रशिक्षणातील सर्व प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये प्राथमिक आरोग्य सेवा बळकटीकरण, आरोग्य संस्थांमधील सेवा गुणवत्ता वाढविणे, समुदायाच्या आरोग्य गरजांनुसार सेवा उपलब्ध करून देणे तसेच विविध आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी दिली.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी