आयुष्मान भारतअंतर्गत ११ जिल्ह्यांतील शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण
पुणे, 19 सप्टेंबर (हिं.स.)। आयुष्मान भारत उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या शालेय आरोग्य व सशक्तीकरण कार्यक्रमासाठी राज्यातील ११ जिल्ह्यांतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे चारदिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण २१ ते २४
MJPJY


पुणे, 19 सप्टेंबर (हिं.स.)। आयुष्मान भारत उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या शालेय आरोग्य व सशक्तीकरण कार्यक्रमासाठी राज्यातील ११ जिल्ह्यांतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे चारदिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण २१ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. नोंदणी केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींनी प्रत्येक ऑनलाइन सत्राला निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे आधी उपस्थित राहावे, असे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी दिले आहेत.

आयुष्मान भारत उपक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने शालेय आरोग्य कार्यक्रम राबविला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे आणि शालेय स्तरावर आरोग्याशी संबंधित उपक्रम प्रभावीपणे राबविणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.महाराष्ट्रात ठाणे, जालना, पालघर, नाशिक, यवतमाळ, हिंगोली, अहिल्यानगर, रायगड, परभणी, लातूर आणि वर्धा या ११ जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे.

या जिल्ह्यांतील इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच शासकीय अनुदानित शाळांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांना आवश्यक मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक गरजा, आरोग्य जनजागृती आणि सशक्तीकरणाशी संबंधित उपक्रम शाळांमध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होणार आहे.नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणातील सर्व सत्रांना नियमित उपस्थित राहून वेळेचे काटेकोर पालन करावे, असे विद्या प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande