
नांदेड, 19 सप्टेंबर (हिं.स.) : राज्यातील काही भागांत पावसाने महिनाभराचा खंड दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील पुयणी गावाला भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, सुकत चाललेली पिके आणि पिकांची सद्यस्थिती याची कृषिमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांकडून पिकांचे नुकसान आणि सध्या भेडसावत असलेल्या विविध अडचणींबाबत माहिती घेण्यात आली.
कागदावरील अहवालापेक्षा प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे भरणे यांनी यावेळी सांगितले. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही भरणे यांनी सांगितले.
दरम्यान, कृषिमंत्री भरणे हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महसूल विभागातील विविध भागांना भेटी देत आहेत. या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे.
या पाहणीनंतर शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असून, त्यानुसार आवश्यक मदत आणि उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे भरणे यांनी सांगितले. शेतकरी अडचणीत असताना शासन त्यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis