
सोलापूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. उजनी धरणात सध्या ९९.८१ टक्के पाणीसाठा असला, तरी जिल्ह्यातील अन्य प्रकल्पांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे उजनीतील पाणी प्राधान्याने पिण्यासाठी उपलब्ध राहावे, यासाठी उजनी परिसरातील वीजपुरवठा दोन तासांवर आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.दरम्यान, उजनी वगळता जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. आष्टी प्रकल्पात ७१.९७ टक्के, एकरुखमध्ये ३८ टक्के, जवळगाव आणि मांगी प्रकल्पात प्रत्येकी १९ टक्के, हिंगणीमध्ये ८ टक्के आणि बोरीमध्ये अवघा ३ टक्के पाणीसाठा आहे. ढाळे पिंपळगाव प्रकल्पातील पाणीसाठा उणे १२ टक्क्यांवर गेला आहे.जिल्ह्यातील ५६ लघु प्रकल्पांमध्ये केवळ २ टक्के, तर ९० कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये ५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळातील पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड