
पिंपरी, 19 सप्टेंबर (हिं.स.) : शहरातील इमारतींच्या गच्च्यांवर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पब आणि पार्टी स्पेसची संख्या वाढत असताना महापालिकेच्या ताज्या सर्वेक्षणात केवळ सात अनधिकृत रुफटॉप हॉटेल्स आढळली आहेत. विशेष म्हणजे, २०२३ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात तब्बल ४९ रुफटॉप हॉटेल्सची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या तपासणीतही २१ अनधिकृत हॉटेल्स आढळली होती. विविध विभागांच्या आकडेवारीतील या तफावतीमुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सर्वेक्षणाच्या अचूकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, चिंचवड, निगडी-प्राधिकरण, स्पाइन रोड, रावेत आणि भोसरी परिसरात अनेक इमारतींच्या टेरेसवर हॉटेल, पब, रेस्टॉरंट आणि पार्टी स्पेस सुरू आहेत. पिंपळे सौदागरमधील काही प्रमुख रस्त्यांवर तर एकाच परिसरात अनेक रुफटॉप हॉटेल्स सुरू असल्याचे दिसून येते.या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. त्याचबरोबर किचन, गॅस सिलिंडर, विद्युत सजावट आणि ग्राहकांसाठी आसनव्यवस्थाही करण्यात आलेली असते. असे असताना महापालिकेच्या ताज्या पाहणीत संपूर्ण शहरात केवळ सात अनधिकृत रुफटॉप हॉटेल्सची नोंद होणे आश्चर्यकारक ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु