
सोलापूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। उत्तर सोलापूर तालुक्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची’ प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. अभियानाच्या तालुकास्तरीय कक्षाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती तथा उपाध्यक्ष इंद्रजीत पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते करण्यात आले.
या अभियानातून ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता, लोकसहभाग, सुशासन आणि विविध विकासात्मक उपक्रमांना चालना देण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर ‘एक दिवस स्वच्छतेसाठी’ या उपक्रमांतर्गत स्वयंस्फूर्तीने गावाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱ्या तरुणांचा विशेष सन्मान करण्यात आला.मार्डी, बीबीदारफळ, कौठाळी आणि अकोलेकाटी येथील सरपंच तसेच स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेणाऱ्या तरुणांचा जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तरुणांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी इतर गावांसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ करण्यात आला.
पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत अभियान प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.अभियानाच्या निमित्ताने उत्तर सोलापूर पंचायत समिती परिसरातून बाईक रॅली काढण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. रॅली डफरीन चौकमार्गे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, रंगभवन येथे पोहोचली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती तथा उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱ्या गावांचा आदर्श इतर गावांनी घ्यावा, असे आवाहन केले. आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा आणि लोकसहभागातून स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवावेत, असे त्यांनी सांगितले.
-------------------
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड