
पुणे, 19 सप्टेंबर (हिं.स.) | सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याच्या नऊ जिल्ह्यांतील २९८ तक्रारी आणि तपासणी केलेल्या ५५ नमुन्यांपैकी १० नमुने अप्रमाणित आढळल्याने मध्य प्रदेशातील मे. एसकेबी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा महाराष्ट्रातील बियाणे विक्री परवाना कृषी विभागाने रद्द केला आहे. कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर यांनी मंगळवारी (ता. १५) याबाबत आदेश जारी केला.
खरीप हंगाम २०२६ मध्ये कंपनीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत सोयाबीन बियाण्याचा पुरवठा केला होता. कंपनीने साथी पोर्टलवर नोंदविलेल्या माहितीनुसार, ५ हजार ७१० क्विंटल सत्यतादर्शक बियाण्याचा पुरवठा करण्यात आला. या बियाण्याची पेरणी केल्यानंतर उगवण झाली नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या.तक्रारींची दखल घेत कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांनी क्षेत्रीय पातळीवर कंपनीच्या विविध वाणांचे ५५ नमुने घेतले. प्रयोगशाळा तपासणीत त्यापैकी १० नमुने अप्रमाणित आढळले. यानंतर विभागाने कंपनीविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केली.
कंपनीला १७ ऑगस्ट रोजी सुनावणीची नोटीस बजावण्यात आली. कंपनीचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर १ सप्टेंबर रोजी प्रथम सुनावणी झाली. कंपनीने आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितल्यानंतर ११ सप्टेंबर रोजी अंतिम सुनावणी घेण्यात आली.सुनावणीदरम्यान कंपनीने परवान्यात समाविष्ट नसलेल्या वाणाचे नाव बियाण्याच्या लेबलवर छापल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बियाणे कायदा १९६६ मधील खंड ७ (अ), (ब), (क) तसेच बियाणे नियम १९६८ मधील नियम १०चा भंग झाल्याचे कृषी विभागाने नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु