
पुणे, 19 सप्टेंबर (हिं.स.) सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर राहून ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ कारखान्याला ऊस पुरवठा करतात या आधारावर सभासदत्व देता येणार नाही, असे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २२ मधील तरतुदीनुसार सहकारी साखर कारखान्याचे सभासद संबंधित कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असणे बंधनकारक आहे.साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार, कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्तीने सभासदत्वासाठी अर्ज केल्यानंतर त्यावर विहित मुदतीत निर्णय घेणे आवश्यक आहे.सभासदत्वासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीची पात्रता नियमांनुसार नसल्यास संबंधित अर्ज कारणासहित नाकारावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ ऊस पुरवठ्याचा संबंध असल्याने कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तींना सभासदत्व देण्यास कारखान्यांना मर्यादा येणार आहेत.दरम्यान, सभासदत्वाचा अर्ज नाकारण्यात आल्यास संबंधित व्यक्तीस महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम २३ अन्वये प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे अपील करता येणार आहे. त्यामुळे सभासदत्वाच्या प्रक्रियेत पात्रता, कार्यक्षेत्र आणि अर्जावरील निर्णय याबाबतची प्रक्रिया अधिक स्पष्ट करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु