परभणी - माझे गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत ३० वर्षांवरील नागरिकांची आरोग्य तपासणी
परभणी, 02 सप्टेंबर (हिं.स.) जिल्ह्यात ३० वर्षांवरील नागरिकांसाठी १०० दिवसांचे तीस वर्षाचा पल्ला, तपासणी अन् सल्ला विशेष अभियान १ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोगाचे लवकर निदान करून निरोगी कुटुंब, निरोगी गाव आणि आरोग्य
परभणी - माझे गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत ३० वर्षांवरील नागरिकांची आरोग्य तपासणी


परभणी, 02 सप्टेंबर (हिं.स.) जिल्ह्यात ३० वर्षांवरील नागरिकांसाठी १०० दिवसांचे तीस वर्षाचा पल्ला, तपासणी अन् सल्ला विशेष अभियान १ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोगाचे लवकर निदान करून निरोगी कुटुंब, निरोगी गाव आणि आरोग्यसंपन्न परभणीचा संकल्प करण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव तसेच अन्य कारणांमुळे नागरिकांमध्ये असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे.

जिल्ह्यात तीस वर्षीवरील ११ लक्ष ६५ हजार ५२४ नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ६१ हजार ६७२ रक्तदाब,३१ हजार ७४३ मधुमेह तसेच कर्क रुग्णांमध्ये ८९ तोंडाचा, ५६ स्तनाचे आणि ५० गर्भाशय मुख रुग्णसंख्या आहे. यांसारख्या आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास त्यांचे योग्यवेळी उपचाराही सुरू करता येतात.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निरोगी महाराष्ट्राच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून जिल्ह्यात माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या पुढील टप्प्यात ३० वर्षे व त्यावरील महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी, निदान, उपचार तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी १ सप्टेंबर ते १० डिसेंबर, २०२६ या कालावधीत १०० दिवसांचे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.

व्यवस्थापन व वेळेत उपचार करणे अधिक सुलभ होते. त्यामुळे अशा आजारांचे लवकर निदान करण्यावर या अभियानात विशेष भर देण्यात येणार आहे.

अभियानांतर्गत ३० वर्षे व त्यावरील नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच तोंडाचा, स्तनाचा व गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी प्राथमिक तपासणी करण्यात येईल. तपासणीमध्ये संशयित आढळणाऱ्या नागरिकांना पुढील तपासणी व उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थेकडे संदर्भित करण्यात येणार आहे. तपासणीपासून निदान, उपचार आणि त्यानंतरच्या पाठपुराव्यापर्यंत आवश्यक कार्यवाही सुनिश्चित करण्यात येणार आहे.

सात टप्यांत अभियानाची अंमलबजावणी अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ३० वर्षांवरील

नागरिकांची नोंदणी, पहिल्या टप्प्यात गावपातळीवर प्रथम तीन गावांतील नागरिकांची तपासणी, दुसऱ्या टप्प्यात उर्वरित गावांतील नागरिकांची तपासणी, उपकेंद्र स्तरावरील तपासणी, तालुका व जिल्हास्तरावरील तपासणी आणि आवश्यक आरोग्य सेवा यांचा समावेश आहे. या सर्व टप्प्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्व नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसण्याची वाट न पाहता ३० वर्षे व त्यावरील प्रत्येक महिला व पुरुषाने नियमित आरोग्य तपासणी करून या अभियानाचा लाभ घ्यावा. उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच तोंडाचा, स्तनाचा किंवा गर्भाशय मुखाचा कर्करोग यांचे लवकर निदान झाल्यास वेळेत उपचार करणे शक्य होते.

त्यामुळे नागरिकांनी आपल्या जवळच्या उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र किंवा संबंधित शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि अभियानाचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आशा ग्रामपंचायती, स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत आरोग्य तपासणीची सुविधा पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande