

रायगड, 02 सप्टेंबर, (हिं.स.)। रायगड जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांचा कर्जत येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी खासदार श्रीरंग (अप्पा) बारणे, आमदार महेंद्र दळवी तसेच शिवसेना पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना आमदार महेंद्र थोरवे यांनी विधानपरिषदेतील विजयाला रायगडच्या स्वाभिमानाचा विजय असे संबोधत राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भरत गोगावले यांचे नाव सर्वप्रथम असल्याचा दावा करत त्यांनी, सत्य कधीही पराजित होत नाही; आज भरतशेठांचा नागरी सत्कार हा जनतेच्या विश्वासाचा सन्मान आहे, असे सांगितले.
रेल्वे उड्डाणपूलाच्या कामावरूनही थोरवे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. खासदार अप्पा बारणे यांच्या प्रयत्नातून पूल मंजूर झाल्याचे सांगत, १५ जुलै रोजी एनओसी देण्यात आली असून याबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा संतप्त सवाल त्यांनी केला. तसेच टाटा-टोरेंट प्रकल्पाच्या मुद्द्यावरही विरोधकांवर टीका करत, यापुढे स्टंटबाजी चालणार नाही; कर्जतमध्ये आंदोलनाला जसास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही दिला.
आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे कुटुंबामुळे भरत गोगावले यांना पालकमंत्री होण्यास विलंब झाल्याचा आरोप केला. चार वेळा आमदार झालेल्या भरतशेठांना पालकमंत्री होणार हे निश्चित होते, असे ते म्हणाले.
खासदार श्रीरंग बारणे यांनी भरत गोगावले यांच्या जनसंपर्क व सर्वसामान्यांसाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. तुंगी आदिवासी भागातील वीज, रस्ता आणि कर्जतसाठी १४ कोटी ३ लाख रुपयांचा निधी दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
पालकमंत्री भरत गोगावले यांनी उत्तरपर भाषणात कोणावरही टीका न करता विकासालाच प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. गेली पाऊणे दोन वर्षे तुम्ही माझ्यासाठी वाट पाहिली. प्रत्येक तालुक्याच्या विकासासाठी सर्वाधिक निधी देण्याचा प्रयत्न करीन, अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)