
महाराष्ट्रातील प्रश्नांवर प्रमुख नेत्यांशी चर्चा : माणिकराव ठाकरे
नाशिक, 02 सप्टेंबर (हिं.स.)।
: काँग्रेसचे नेते राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर येण्यामागे कोणताही राजकीय गुप्त अजेंडा नाही. पक्षाच्या संगठन सृजन अभियानच्या माध्यमातून संघटन मजबूत करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांशी संवाद साधणे हा उद्देश होता अशी माहिती काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी नाशिकमध्ये दिली.
राहूल गांधी यांच्या दौऱ्यानिमित्त ठाकरे नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,' महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक परिस्थिती जाणून घेण्यासाठी राहूल गांधी यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसोबत तसेच विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. राज्यातील प्रश्न, संघटनेची सद्यस्थिती, कार्यकर्त्यांच्या अडचणी तसेच काँग्रेसच्या विचारधारेनुसार संघटन अधिक मजबूत करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.संघटनात्मक बैठकींसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील लोकांना बोलावण्यात आले होते. जिल्हाध्यक्षांची निवड कशी झाली, त्यामागील प्रक्रिया काय होती, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि संघटनात्मक कामाची दिशा याबाबतही चर्चा करण्यात आली. काँग्रेसची संस्कृती, पक्षाची विचारधारा आणि कार्यकर्त्यांमध्ये परस्पर जवळीक वाढविण्याची गरज यावरही बैठकीत भर देण्यात आला. इतर राज्यांमध्ये संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने काम करण्यात आले, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही संघटनात्मक प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबाशीही संवाद
राहूल गांधी यांनी जिल्हाध्यक्षाच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. जिल्हाध्यक्षांना संघटनेचे काम करताना अनेकदा घरापासून दूर राहावे लागते. पक्षासाठी वेळ देताना त्यांच्या कुटुंबाचीही भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. पक्ष म्हणजे केवळ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रचना नसून ‘काँग्रेस एक घर आहे, विचारांचे घर आहे’, या भावनेतून हा संवाद साधण्यात आल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.पक्ष वाढीसाठी काय स्वीकारायचे, कोणत्या पद्धतीने संघटन उभे करायचे आणि स्थानिक परिस्थितीनुसार कोणते निर्णय घ्यायचे, हे संबंधित जिल्हाध्यक्षांनी ठरवायचे आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद; ‘झेन झी’ आंदोलनाचाही संदर्भ
राज्यातील सामाजिक आणि विद्यार्थी प्रश्नांकडेही काँग्रेसचे लक्ष असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘झेन झी’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती तसेच आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न याबाबतही संवाद सुरू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली जात आहे. मात्र, महाराष्ट्रातील संपूर्ण राजकीय परिस्थिती एका बैठकीत हाताळली जात नाही. विविध स्तरांवर आणि वेगवेगळ्या बैठकींतून माहिती घेतली जाते. दिल्लीतही बैठका होत असून, अनेक व्यक्ती आणि घटकांकडून परिस्थितीची माहिती घेतली जात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
‘मार्शल आर्ट’चा राजकारणाशी संबंध नाही
मार्शल आर्ट हा कोणताही स्वतंत्र राजकीय विषय नाही. कार्यकर्ता शारीरिकदृष्ट्याही सक्षम आणि ‘फिट’ असला पाहिजे, हा त्यामागील दृष्टिकोन आहे. कार्यकर्त्याला पक्षाचे काम करण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.राजकारणात प्रत्येक विषय एका बैठकीत अंतिम करण्याऐवजी विविध स्तरांवर चर्चा करून निर्णय घेण्याची काँग्रेसची पद्धत आहे. त्यामुळे नाशिक दौऱ्यातील चर्चा ही व्यापक संघटनात्मक प्रक्रियेचा एक भाग आहे. पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण व्हावी, आपण सर्वजण एकत्र आहोत, ही भावना दृढ व्हावी आणि संघटनात्मक पातळीवर एकजूट वाढावी, या उद्देशाने राहुल गांधी यांच्या भेटीचे आयोजन करण्यात आले होते, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
‘लहान काळ असतो; संघटन महत्त्वाचे’
पद आणि राजकीय जबाबदाऱ्यांचा काळ मर्यादित असतो; मात्र पक्षाची विचारधारा आणि संघटना दीर्घकाळ टिकणारी असते. त्यामुळे व्यक्तीपेक्षा संघटन आणि विचार महत्त्वाचा असल्याचा संदेश या संपूर्ण प्रक्रियेतून देण्यात येत आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये परस्पर संवाद, जवळीक आणि विश्वास वाढविण्याची आवश्यकता असून, त्यासाठी अशा भेटी महत्त्वपूर्ण ठरतात, असे ठाकरे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI