आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना राहुल गांधींचा पाठिंबा
नाशिकमधील ‘सेंट्रल किचन’सह विविध प्रश्नांवर दीड तास चर्चा मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार नाशिक, २ सप्टेंबर (हिं.स.) : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण
कांग्रेस के पूर्व अध्यक्ष और लोकसभा में नेता प्रतिपक्ष राहुल गांधी (फाइल फोटो)।


नाशिकमधील ‘सेंट्रल किचन’सह विविध प्रश्नांवर दीड तास चर्चा

मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार

नाशिक, २ सप्टेंबर (हिं.स.) : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थी कृती समितीच्या प्रतिनिधींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सुमारे दीड तास सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मागण्या रास्त असून, त्यांना आपला शंभर टक्के पाठिंबा असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितल्याची माहिती समितीचे प्रतिनिधी सोनू गायकवाड यांनी दिली.

आदिवासी विकास विभागातील सुमारे १२ हजार ५०० रिक्त पदांची तातडीने भरती करावी, आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, वसतिगृहांमध्ये सुरू असलेली ‘सेंट्रल किचन’ अर्थात मध्यवर्ती स्वयंपाकगृहाची पद्धत बंद करावी, बिंदुनामावलीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, तसेच वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडवाव्यात, अशा प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या.

गडचिरोलीतील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मदतीची मागणी

गडचिरोली येथे मृत्यू झालेल्या तीन आदिवासी विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही प्रतिनिधींनी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा तसेच वसतिगृहांमधील सुविधांचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत, शासनाने या बाबीकडे केवळ प्रशासकीय विषय म्हणून न पाहता संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली.

‘सेंट्रल किचन’ची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन

वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भोजनाच्या व्यवस्थेबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ‘सेंट्रल किचन’ पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. या व्यवस्थेची प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी नाशिकसह महाराष्ट्रातील ज्या वसतिगृहांमध्ये ‘सेंट्रल किचन’ पद्धत सुरू आहे, त्या ठिकाणी स्वतः भेट देऊन पाहणी करण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिल्याचे समितीच्या प्रतिनिधींनी सांगितले.

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच

आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर स्थानिक पातळीवरील आमदार आणि खासदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत सर्व मागण्यांना पाठिंबा दर्शविल्याने प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, केवळ आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या प्रत्यक्षात मान्य होऊन त्याबाबत ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शासन आणि आंदोलकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande