लातूर विभागात ग्राहकांच्या तक्रारी निवारणासाठी आता दरमहा ‘डाक अदालत’
लातूर, 02 सप्टेंबर (हिं.स.) : भारतीय डाक विभागामार्फत ग्राहकांच्या तक्रारी व समस्या अधिक प्रभावीपणे आणि वेगाने सोडविण्यासाठी सप्टेंबर २०२६ पासून दरमहा ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात येणार आहे. ग्राहकांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी ही डाक अदालत
डाक अदालत


लातूर, 02 सप्टेंबर (हिं.स.) : भारतीय डाक विभागामार्फत ग्राहकांच्या तक्रारी व समस्या अधिक प्रभावीपणे आणि वेगाने सोडविण्यासाठी सप्टेंबर २०२६ पासून दरमहा ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात येणार आहे. ग्राहकांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी ही डाक अदालत विभागीय, प्रादेशिक व मंडळ (सर्कल) स्तरावर अनुक्रमे दर महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात आयोजित करण्यात येईल.

या उपक्रमांतर्गत ग्राहकांना आवश्यकतेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेही डाक अदालतीत सहभागी होता येणार आहे. ग्राहकांना आपली तक्रार अथवा गाऱ्हाणी टपालाद्वारे, प्रत्यक्ष भेटून किंवा spolatur.mah@gmail.com या ई-मेल आयडीवर सादर करता येतील. प्राप्त तक्रारींची संबंधित कार्यालयाकडून सविस्तर तपासणी करण्यात येईल आणि शक्य असल्यास डाक अदालतीच्या वेळीच तक्रारींचे निराकरण केले जाईल, तसेच डाक अदालतीत प्राप्त सर्व तक्रारींचे १४ दिवसांच्या आत अनिवार्यपणे निराकरण करण्यात येईल.

विभागीय स्तरावरील डाक अदालत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केली जाणार असून, पहिल्या सोमवारी शासकीय सुट्टी असल्यास त्यानंतरच्या पुढील कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत डाक अधीक्षक कार्यालय, लातूर विभाग, लातूर प्रधान डाकघर इमारत, दुसरा मजला, महात्मा गांधी चौक, लातूर-४१३५१२ येथे ही अदालत पार पडेल.

डाक अदालतीच्या दिवशी ग्राहकांना आवश्यक ते सर्व सहकार्य मिळावे, तसेच व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या कार्यवाहीचे योग्य समन्वय साधण्यासाठी लातूर मुख्य डाकघर येथे जनसंपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लातूर विभागातील ग्राहकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या तक्रारी व गाऱ्हाणी डाक अदालतीमार्फत मांडावीत, असे आवाहन लातूर येथील डाक अधीक्षक आर. एस. बोटलवार यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande