अमरावती : कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थेट बँक खात्यात जमा करा - खा.अनिल बोंडे
अमरावती, 02 सप्टेंबर (हिं.स.)। महानगरपालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि शासकीय संस्थांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कराराप्रमाणे संपूर्ण वेतन थेट त्यांच्या बँक खात्य
कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थेट बँक खात्यात जमा करा; खासदार डॉ. अनिल बोंडे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी


अमरावती, 02 सप्टेंबर (हिं.स.)। महानगरपालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि शासकीय संस्थांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कराराप्रमाणे संपूर्ण वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे, अशी मागणी राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून तातडीने आदेश देण्याची विनंती केली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कंत्राटदारां मार्फत होणारे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी पीएफ (PF), ईएसआयसी (ESIC) आणि जीएसटी (GST) ची रक्कम प्रशासनाने स्वतः कपात करून उर्वरित सर्व वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात टाकावे, तर कंत्राटदाराला केवळ त्याचे कमिशन देण्यात यावे, असा महत्त्वाचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. कंत्राटदारांकडून २० हजार रुपयांऐवजी केवळ ८ हजार रुपये खात्यात टाकले जातात आणि तक्रार केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. तसेच नवीन ठेकेदार आल्यावर नवीन भरती करून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला जातो. या सर्व बाबींवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देऊन जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थेट बँकेत जमा करण्याची पद्धत लागू करावी, अशी मागणी डॉ. अनिल बोंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.

------------------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande