
हिंगोली, 02 सप्टेंबर, (हिं.स.)। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामातील पीक नोंदणीच्या कामकाजासह महसूल, कृषी, भूसंपादन विभागाशी संबंधित विविध विषयांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, उपजिल्हाधिकारी (महसूल) अनिल माचेवाड, भूसंपादन उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत वनपट्टेधारकांसाठी स्वतंत्र गाव नमुना क्रमांक 7 ई/12 ई तयार करण्याच्या कामकाजाचा, शेतकरी ओळख क्रमांक नोंदणीच्या प्रगतीचा तसेच वनहक्कधारकांना प्रदान करण्यात आलेल्या कम्पार्टमेंटमधील पट्ट्याच्या आधारे गाव नमुना क्रमांक सातबारा तयार करण्याच्या कामकाजाचा तालुकानिहाय सविस्तर आढावा घेतला. तसेच शासकीय जमिनींचे Ground Truthing करून त्यांची Land Bank मध्ये नोंद करण्याबाबत आणि जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील अनियमितता तपासणीसाठी गठीत समितीने सुचविलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या सनियंत्रण पोर्टलच्या वापराबाबत यावेळी माहिती देण्यात आली. या योजनेअंतर्गत तातडीने देण्यात आलेली कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या. ज्या सर्व्हे क्रमांकासाठी सातबारा व मिळकत पत्रिका अशा स्वरूपात दुहेरी अधिकार अभिलेख सुरू आहेत, त्या सर्व्हे क्रमांकांचा सातबारा बंद करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील कलम 122 अन्वये करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. याशिवाय प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक कापणी प्रयोगाच्या नोंदणीच्या कामकाजाचा आढावा घेऊन पीक कापणी प्रयोगांची नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis