
तीनही प्रकल्पांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड
नंदुरबार, २ सप्टेंबर (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, पिंपरी सद्रो (ता. इगतपुरी) येथे नुकत्याच झालेल्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील क्लस्टरस्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनात एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, ढोंगसागाळी (जि. नंदुरबार)च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. शाळेने सादर केलेल्या तीनही प्रकल्पांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. ही माहिती शाळेचे प्राचार्य अनिल मंगळे यांनी दिली.
ज्युनिअर गटातील विज्ञान विभागात दिया सायसिंग पाडवी आणि रियान निलेश वसावे यांनी सादर केलेल्या ‘कृषीतील स्वयंचलन’ या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला. या कार्यरत मॉडेलमध्ये सौरऊर्जा, स्वयंचलित सिंचन, पाण्याची बचत, सेन्सर-आधारित सूचना तसेच आधुनिक पीक संरक्षण यांसारख्या तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर प्रभावीपणे दाखविण्यात आला.
गणित विभागात सुजिता अरविंद गावित आणि नूतन भरत पावरा यांच्या ‘त्रिकोणमिती उद्यान’ या प्रकल्पाने द्वितीय क्रमांक मिळविला. त्रिकोणमितीतील किचकट संकल्पना दैनंदिन जीवनातील उदाहरणांशी जोडून त्या सोप्या आणि रंजक पद्धतीने मांडण्यात आल्या.
सीनियर गटात अरमान राजन वळवी आणि वैभव रवींद्र पाडवी यांच्या ‘शाश्वत ग्राम’ या प्रकल्पाने सहावा क्रमांक मिळविला. शाश्वत विकास, उपलब्ध संसाधनांचा समतोल वापर आणि पर्यावरणपूरक ग्रामरचना या संकल्पनांवर आधारित हा प्रकल्प सादर करण्यात आला.
या यशाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ‘कृषीतील स्वयंचलन’, ‘त्रिकोणमिती उद्यान’ आणि ‘शाश्वत ग्राम’ या तिन्ही प्रकल्पांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षिका शिवानी दीक्षित तसेच वडमारे सुबोध जिजा, भुरू चौधरी आणि विशाल कुमार यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य अनिल मंगळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले असून, राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
--------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर