
धोक्यात
साडेआठ लाख हेक्टरवर पिके; कोरडवाहू भागातील पिके करपण्याच्या मार्गावर
यवतमाळ, २ सप्टेंबर (हिं.स.)। पावसाच्या भरवशावर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी केलेली कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आता धोक्यात आली आहे. जिल्ह्यात यंदा सुमारे ८ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून, पेरणीपूर्व मशागत, बियाणे, खते, लागवड, फवारणी, निंदण आदींसाठी हेक्टरी किमान ४५ हजार रुपये खर्च झाला आहे. या हिशेबाने जिल्ह्यातील खरीप पिकांमध्ये शेतकऱ्यांची जवळपास तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक उभी आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी दडी मारल्याने ही गुंतवणूक संकटात सापडली आहे. कोरडवाहू भागातील पिके करपण्याच्या मार्गावर असून, आगामी काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांसमोरील संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना चांगली सुरुवात मिळाली होती. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने पिकांची उगवण आणि सुरुवातीची वाढ समाधानकारक झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी दडी मारल्याने परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. जमिनीतील ओलावा दिवसेंदिवस कमी होत असून, अनेक भागांत पिके माना टाकू लागली आहेत.
पावसाचा खंड आणखी वाढल्यास कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः कोरडवाहू क्षेत्रातील पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतांमध्ये पिके वाचविण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता आभाळाकडे लागले असून, शेतातील उभे पीक वाचविण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.
कापसाचा सर्वाधिक पेरा
जिल्ह्यात यंदा कापसाचा सर्वाधिक ४ लाख ८९ हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. त्यापाठोपाठ २ लाख ४५ हजार हेक्टरवर सोयाबीन, तर १ लाख ५ हजार हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ८ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून, पेरणीचे प्रमाण सुमारे ९९ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
सुरुवातीच्या काळात झालेला पाऊस पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरला असला तरी सध्या पिकांच्या महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याची गरज वाढली आहे. कापूस बोंडधारणेच्या टप्प्याकडे जात असताना, सोयाबीनमध्ये शेंगा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तुरीचीही वाढ सुरू आहे. अशा परिस्थितीत पावसाचा दीर्घ खंड पडल्यास उत्पादनक्षमतेवर परिणाम होण्याची भीती आहे.
पावसाचा खंड वाढल्यास उत्पादनावर परिणाम
जमिनीतील ओलावा कमी झाल्याने हलक्या जमिनीवरील पिकांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. पावसाचा खंड आणखी वाढल्यास पिकांची वाढ खुंटणे, फुलधारणा आणि शेंगा भरण्यावर परिणाम होणे तसेच उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापर्यंत केलेला खर्च आणि पुढील अपेक्षित उत्पादन यांचा ताळमेळ बिघडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, पावसाचा दीर्घ खंड संपल्यानंतर अचानक मोठा पाऊस झाल्यासही पिकांसमोर वेगळी संकटे उभी राहू शकतात. सोयाबीनच्या शेतात पाणी साचणे, कापसावर रोग-किडीचा प्रादुर्भाव वाढणे आणि जमिनीतील पोषणद्रव्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाचे प्रमाण आणि सातत्य दोन्ही खरीप पिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
हेक्टरी ४५ हजारांचा खर्च
खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व मशागत, बियाणे, खते, लागवड, फवारणी, निंदण आदी कामांवर हेक्टरी किमान ४५ हजार रुपये खर्च झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ८ लाख ४३ हजार हेक्टर खरीप क्षेत्राचा विचार करता शेतकऱ्यांची हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक पिकांच्या रूपाने शेतात उभी आहे.
पिकांना पाणी मिळाले आणि उत्पादन चांगले झाले तर ही गुंतवणूक काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्यास उत्पादनातील घट तर होईलच; शिवाय आतापर्यंत केलेला खर्चही वसूल करणे शेतकऱ्यांसाठी कठीण होणार आहे.
आता आभाळाकडे नजर
पावसाळ्याचे काही दिवस अद्याप शिल्लक असले तरी ऑगस्टमधील पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतात उभे असलेले पीक वाचविण्यासाठी आता आणखी एका दमदार पावसाची गरज आहे. वेळेत चांगला पाऊस झाल्यास जमिनीतील ओलावा वाढून पिकांना पुन्हा उभारी मिळू शकते. मात्र, पावसाने आणखी दगा दिल्यास खरीप उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी केलेली कोट्यवधींची गुंतवणूक सध्या पूर्णपणे पावसाच्या लहरीवर अवलंबून आहे. पाऊस आला तर पीक सावरण्याची आशा; अन्यथा हजारो कोटींच्या गुंतवणुकीवर पाणी फिरण्याची भीती, अशी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी