
लातूर, 02 सप्टेंबर (हिं.स.) : बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आधुनिक आहारपद्धतीमुळे पारंपरिक रानभाज्या आहारातून हद्दपार होत आहेत. या भाज्यांमधील औषधी व आरोग्यदायी गुणधर्म लक्षात घेता त्यांचे संवर्धन करून नियमित आहारात त्यांचा समावेश करणे आवश्यक आहे, असे जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील यांनी सांगितले.
लातूर कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने कल्पतरू मंगल कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषि सभापती कविता गोरे, कृषि सहसंचालक महेश तीर्थकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दिलीप जाधव, आत्माच्या प्रकल्प संचालक मनिषा बांगर, कृषि विकास अधिकारी दीपक सुपेकर, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे संदीप देशमुख, आहारतज्ज्ञ डॉ. प्रियांका शेंडगे यांच्यासह कृषी क्षेत्रातील मान्यवर आणि पुरस्कारप्राप्त शेतकरी उपस्थित होते.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना
ग्रामीण भागातील महिलांना रानभाज्यांची थेट ग्राहकांना विक्री करता यावी, यासाठी रानभाजी महोत्सव महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. मात्र, केवळ एका दिवसापुरता महोत्सव न ठेवता रानभाज्यांना नियमित बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यामुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळेल. पारंपरिक रानभाज्यांचे संवर्धन करणाऱ्या महिला बचत गटांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे उषाताई पाटील यांनी सांगितले.
रानभाज्यांचा आहारातील वापर वाढविण्याचे आवाहन
उत्तम आरोग्यासाठी रानभाज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या पारंपरिक भाज्यांचे संवर्धन आणि त्यांचा आहारातील वापर वाढविणे ही काळाची गरज आहे. महिलांनी पुढाकार घेऊन आपल्या कुटुंबाच्या आहारात रानभाज्यांचा वापर वाढवावा, असे आवाहन कृषि सभापती कविता गोरे यांनी केले.
माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
महोत्सवाच्या निमित्ताने रानभाज्यांची सविस्तर आणि सचित्र माहिती देणाऱ्या ‘ओळख रानभाज्यांची...’ या विशेष माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.यावेळी कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी श्रीकृष्ण शिंदे आणि जिजामाता पुरस्कारप्राप्त महिला शेतकरी संजीवनी नागमोडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis