
अमरावती, 02 सप्टेंबर (हिं.स.)। अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्या वतीने दरवर्षी मोठ्या जल्लोषात आणि भव्य स्वरूपात साजरा होणारा दहीहंडी उत्सव यंदा मात्र अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात एनआयसीयू विभागात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या हृदयद्रावक घटनेनंतर आमदार रवी राणा यांनी यंदाचा भव्य दहीहंडी महोत्सव रद्द करण्याचा संवेदनशील निर्णय घेतला आहे. दरवर्षी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या दहीहंडी उत्सवात मोठ्या संख्येने गोविंदा पथके सहभागी होतात. लाखो रुपयांची बक्षिसे, प्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती, डीजे आणि मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. मात्र, यंदा तीन निष्पाप नवजात बालकांच्या मृत्यूमुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यावर दुःखाचे सावट आहे. याच दुःखात सहभागी होत आमदार रवी राणा यांनी भव्य दहीहंडी, डीजे, मोठी बक्षिसे आणि जल्लोषाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. मात्र, दहीहंडीची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा खंडित होऊ नये, यासाठी अत्यंत साध्या पद्धतीने बालगोपालांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाचे पूजन करून दहीहंडी फोडण्यात येणार आहे. यासोबतच यंदाचा उत्सव सामाजिक उपक्रमांना समर्पित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तब्बल ५० लाख रुपयांचा निधी विविध सामाजिक आणि लोककल्याणकारी उपक्रमांसाठी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयातील दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या नवजात बालकांच्या पालकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत, दिव्यांगांना आवश्यक साहित्य, बेरोजगार युवकांना रोजगाराचे साधन, महिलांना शिलाई मशीन, आरोग्य सेवा, रक्तदान शिबिरे आणि नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. “उत्सवापेक्षा माणुसकी मोठी” हा सामाजिक संदेश देत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस, महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या चानंतर तसेच माजी खासदार व भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी पत्राद्वारे केलेल्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर नवाथे चौक, अमरावतीसह परतवाडा, धारणी, अंजनगाव सुर्जी आणि तिवसा येथील नियोजित दहीहंडी कार्यक्रमही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी