
परभणी, 02 सप्टेंबर (हिं.स.)।
पाथरी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध विद्युत समस्यांची तातडीने दखल घेत आमदार सईद खान यांनी संबंधित अधिकारी व नगरसेवकांसमवेत शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नागरिकांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहरातील अनेक भागांत डीपीची कमतरता, धोकादायक व जीर्ण विद्युत पोल, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, जुन्या विद्युत वाहिन्या तसेच वारंवार होणारे वीज बिघाड यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सईद खान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेत समस्याग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी कार्यकारी अभियंता काळे यांच्यासोबत शहरातील विद्युत व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या तसेच सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरणाऱ्या समस्या प्राधान्याने सोडविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
प्रलंबित विद्युत प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
पाथरी शहराचा विकास आणि नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा सक्षम करणे हे आपले सर्वोच्च प्राधान्य असून, त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, अशी भूमिका आमदार सईद खान यांनी यावेळी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis