
नवी दिल्ली , 02 सप्टेंबर (हिं.स.)।एससीओ शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यात झालेल्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील सातत्याने वाढत असलेला तणाव कमी करण्याचे संकेत मिळाले आहेत. दोन्ही देशांमध्ये थेट कोणतेही वैर नसतानाही द्विपक्षीय संबंधांमध्ये निर्माण झालेली कटुता दूर करण्याबाबत दोन्ही देशांनी चर्चा केल्याचे संकेत मिळत आहेत.
राष्ट्राध्यक्ष अलीयेव यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आणि भेटीचे छायाचित्रही शेअर केले. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्राध्यक्ष अलीयेव यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एक पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे.
भारत आणि अझरबैजानमधील द्विपक्षीय संबंधांमधील अडचण अशी आहे की, दोन्ही देशांमध्ये कोणत्याही मुद्द्यावर थेट शत्रुत्व नाही; मात्र दोन्ही देश एकमेकांच्या विरोधकांचे मित्र आहेत. अझरबैजान पाकिस्तानला पाठिंबा देतो, तर भारताची आर्मेनियासोबतची मैत्री गेल्या काही वर्षांत सातत्याने अधिक मजबूत होत आहे. गेल्या आठवड्यात एससीओ बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिन्यान यांचीही भेट घेतली होती.
गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूरदरम्यान अझरबैजानने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिल्याची बाब भारताला अत्यंत खटकली होती. अझरबैजानने भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यांचा निषेध केला होता. यापूर्वी अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यात नागोर्नो-काराबाख सीमेवर युद्ध झाले होते. त्यावेळी पाकिस्तानने तुर्कीच्या मदतीने अझरबैजानला पाठिंबा दिला होता.
पाकिस्तान आणि तुर्कीला अझरबैजानसोबत मिळून मध्य आशियात इस्लामिक देशांची ताकद प्रदर्शित करण्याचीही इच्छा आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने कठोर भूमिका घेत शांघाय सहकार्य संघटनेत (SCO) अझरबैजानच्या पूर्ण सदस्यत्वाच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यास नकार दिला होता.अझरबैजान अद्याप या संघटनेचा सदस्य बनलेला नाही. हे राष्ट्राध्यक्ष अलीयेव यांच्या भूमिकेत बदल होण्यामागील एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. त्यांच्या सरकारने गेल्याच वर्षी भारतासोबतचे संबंध परस्पर हिताच्या आधारावर पाहण्याचे आवाहन केले होते.
यावर्षीच्या सुरुवातीला चार वर्षांनंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांदरम्यान बैठक झाली. त्यानंतर मार्च-एप्रिल 2026 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना स्थलमार्गाने बाहेर काढण्यासाठी अझरबैजानने भारताला मदत केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode