
मोजक्या ठेकेदारांचे वर्चस्व संपण्याची शक्यता
बेरोजगार संस्था व नव्या उद्योजकांना मिळणार संधी
अमरावती, २ सप्टेंबर (हिं.स.) : अमरावती महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील ठेक्यांवर वर्षानुवर्षे मोजक्या ठेकेदारांचे असलेले वर्चस्व आता संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील सुमारे २०० उद्यानांच्या देखभालीसाठी लवकरच ई-टेंडरिंग प्रक्रिया राबविण्याचे थेट आदेश आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिले आहेत. त्यामुळे उद्यान विभागातील कामांच्या वाटपात खुल्या स्पर्धेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
उद्यान विभागातील कामांच्या वाटपावरून यापूर्वीही विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका ठेकेदाराकडे ३०, दुसऱ्याकडे २५, तर तिसऱ्या ठेकेदाराकडे १५ उद्यानांच्या देखभालीची कामे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मोजक्याच ठेकेदारांकडे मोठ्या प्रमाणावर कामे केंद्रित झाल्याचे चित्र असल्याचे बोलले जात आहे.
याशिवाय अनेक उद्यानांच्या देखभालीसाठी एकसारखे दर निश्चित असतानाही कामांचे वाटप नेमक्या कोणत्या पद्धतीने केले जाते, याबाबत पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित होत आहे. ई-टेंडरिंगच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रियेत खुली स्पर्धा आणल्यास ठेकेदारांच्या मक्तेदारीला आळा बसण्याची शक्यता आहे.
ई-टेंडरिंगमुळे उद्यान विभागातील कामे केवळ मोजक्या ठेकेदारांपुरती मर्यादित न राहता खुल्या स्पर्धेसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पात्र लहान ठेकेदारांसह बेरोजगार संस्था आणि नव्याने कार्यरत होणाऱ्या संस्थांनाही काम मिळविण्याची संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या निर्णयामुळे उद्यान विभागातील कामकाजात पारदर्शकता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांपासून ठराविक ठेकेदारांचे वर्चस्व असल्याच्या चर्चांनाही या निर्णयामुळे पूर्णविराम मिळू शकतो.
“आता कोणत्याही एका व्यक्तीला किंवा संस्थेला ठेका दिला जाणार नाही. सुमारे २०० उद्यानांच्या समग्र देखभालीसाठी लवकरच ई-टेंडरिंग करण्यात येईल आणि खुल्या स्पर्धेच्या आधारावर कामे दिली जातील,” असे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आयुक्तांच्या या निर्णयाचे बेरोजगार संस्था आणि नव्या उद्योजकांकडून स्वागत होत असून, मक्तेदारीला चाप बसून खुल्या स्पर्धेला संधी मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी