वर्ध्यात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’
१ कोटी ४ लाख ९५ हजारांचा दारूसाठा व मुद्देमाल जप्त वर्धा, २ सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी ‘वॉशआऊट’ मोहीम राबवून अवैध दारूविक्रेत्यांवर मोठी कारवाई केली. जिल्ह्यात एकाच वेळी
वर्ध्यात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’


१ कोटी ४ लाख ९५ हजारांचा दारूसाठा व मुद्देमाल जप्त

वर्धा, २ सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी ‘वॉशआऊट’ मोहीम राबवून अवैध दारूविक्रेत्यांवर मोठी कारवाई केली. जिल्ह्यात एकाच वेळी विविध ठिकाणी छापेमारी करून देशी-विदेशी दारूविक्रीचे २५ आणि गावठी दारूविक्रीचे १०३, असे एकूण १२८ गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाईत सुमारे १ कोटी ४ लाख ९५ हजार ७५ रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.

पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील अवैध दारूविक्रीच्या परिस्थितीचा आढावा घेत ‘सर्जिकल स्ट्राईक’ची योजना आखली. जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेते मोठ्या प्रमाणावर गावठी दारू तयार करून तिचा साठा करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अवैध दारूभट्ट्यांची ठिकाणे शोधून काढण्यासाठी गोपनीय पाळत ठेवण्यास सुरुवात केली.

शहरालगतचा परिसर, गावाबाहेरील भाग, जंगल शिवार तसेच सहज पोहोचता येत नसलेल्या ठिकाणी असलेल्या दारूभट्ट्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. याशिवाय बाहेरील जिल्ह्यांतून चोरट्या मार्गाने आणली जाणारी देशी-विदेशी दारू आणि तिची विक्री करणाऱ्या व्यक्तींच्या हालचालींवरही पोलिसांनी लक्ष ठेवले.

पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील चार उपविभागीय पोलिस अधिकारी, ३७ अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेसह एकूण २६३ पोलिस अंमलदारांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

शनिवारी (२९ ऑगस्ट) पहाटे ६ वाजता जिल्ह्यातील विविध गावांमध्ये असलेल्या गावठी दारूभट्ट्या तसेच देशी-विदेशी दारूविक्रीच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.

या कारवाईत १२९ आरोपींविरुद्ध १२८ गुन्हे दाखल करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर दारूसाठा आणि अन्य मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.

यासंदर्भात वर्धेचे पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल म्हणाले की,“वर्धा जिल्ह्यात अवैध दारूचे कोणतेही प्रकार चालणार नाहीत. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच दारूविक्रेत्यांकडून कोणताही व्यत्यय येऊ नये, यासाठी अशा प्रकारची अचानक कारवाई करण्यात आली आहे.”

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande