
परभणी, 02 सप्टेंबर (हिं.स.)।
अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्या आई-वडिलांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याप्रकरणी आरोपी आशिष रवींद्र रणखांबे (वय २०, रा. साळापुरी, ता. जि. परभणी) यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. सदराणी यांनी दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीस आणखी तीन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.
या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१५/२०२४, कलम १३७ (२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांची अल्पवयीन मुलगी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार त्यांनी केली होती.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योती बळेगावे यांनी केला. तपासादरम्यान आरोपी आशिष रणखांबे याने अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून नाशिक येथे पळवून नेल्याचे आणि ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्यासोबत राहिल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने आरोपीने अल्पवयीन पीडितेला तिच्या आई-वडिलांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याचे संशयापलीकडे सिद्ध केले. त्यानुसार न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून वरील शिक्षा सुनावली.
या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता अॅड. ज्ञानोबा दराडे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. अॅड. अभिलाषा पाचपोर यांनी त्यांना सहकार्य केले.
पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, मपोह/१५१२ फातेमा शेख, मपोह/६५० वंदना आदोडे तसेच पोह/१३४४ सचिन धबडगे यांनी न्यायालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis