
राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्यानंतर चव्हाणांचा भाजपवर निशाणा
पेपरफुटी, कुंभमेळा आणि शक्तिपीठ महामार्गावरही गंभीर आरोप
नाशिक, 02 सप्टेंबर (हिं.स.) : काँग्रेसच्या ‘संगठन सृजन अभियान’अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या ७८ जिल्हाध्यक्षांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचा समारोप बुधवारी काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झाला. यानंतर राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कुंभमेळा, शक्तिपीठ महामार्ग, शेतकऱ्यांच्या समस्या यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या प्रश्नांवर संसदेत आवाज उठविण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिल्याची माहिती माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘नारी वंदन’ कायद्याचा मुद्दा उपस्थित करत काळे कपडे परिधान करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
“काँग्रेसने महिला आरक्षणाला विरोध केला हे कोणत्या मूर्खाने सांगितले? महिला आरक्षणाचे जनक आम्हीच आहोत,” असा दावा चव्हाण यांनी केला. पुढे भाजपला लक्ष्य करत त्यांनी सवाल केला की, “भाजप जर स्वतःला महिलांचे कैवारी मानत असेल, तर आरएसएस एखाद्या महिलेला सरसंघचालक करणार का ?” चव्हाण यांच्या या प्रश्नामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्वोच्च नेतृत्वात महिलांना संधी देण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. महिला आरक्षणाच्या राजकारणावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना या वक्तव्यामुळे नवा राजकीय आयाम मिळण्याची शक्यता आहे.
पेपरफुटीवरून सरकारवर गंभीर आरोप
राज्यातील भरती परीक्षांच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरही चव्हाण यांनी सरकारला लक्ष्य केले. “राज्यातील प्रत्येक भरतीचा पेपर फुटत असून, या घोटाळ्यांमागे भाजपचे वरिष्ठ नेते जबाबदार आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. दोन-दोन कोटी रुपयांना पेपर विकले जात असल्याचा दावा करत या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
कुंभमेळा, शक्तिपीठ महामार्गाच्या कामांवरही टीका
नाशिकच्या विकासकामांवरूनही चव्हाण यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांना नाशिकमध्ये येताना खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागल्याचे सांगत त्यांनी शहरातील रस्त्यांच्या अवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“कुंभमेळ्याचा डीपीआर न बनवताच ठराविक कंत्राटदारांना कामे दिली जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला. कुंभमेळा आणि शक्तिपीठ महामार्गाच्या कामांमध्ये ४० टक्के कमिशनखोरी होत असल्याचाही दावा चव्हाण यांनी केला.
--------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI