
* अमरावती विभागातील पीक परिस्थितीचा कृषीमंत्र्यांनी घेतला आढावा
* शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी; भरीव मदत करणार
अकोला, २० सप्टेंबर (हिं.स.) : एल निनोच्या प्रभावामुळे पावसात पडलेल्या खंडाचा परिणाम पश्चिम विदर्भातील खरीप पिकांवर झाला असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या अडचणी संवेदनशीलतेने समजून घेऊन त्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले. तसेच मुदतपूर्व पीक पाहणीचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे अमरावती महसूल विभागातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आकाश फुंडकर, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागीय आयुक्त नयना गुंडे, कृषी आयुक्त परिमल सिंह, विभागातील खासदार, आमदार, पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले.
बैठकीत अमरावती महसूल विभागातील पाचही जिल्ह्यांतील ५६ तालुक्यांमधील पर्जन्यमान, पावसातील खंड, पीक परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, चारा आदी बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील परिस्थितीचे सादरीकरण केले. त्यानंतर लोकप्रतिनिधींनीही आपल्या भागातील पीक परिस्थिती व शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत माहिती दिली.
पावसातील खंडामुळे खरीप पिकांवर परिणाम
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, एल निनोच्या संकटामुळे पश्चिम विदर्भातील पर्जन्यमानात खंड तसेच असमानता दिसून येत आहे. याचा परिणाम सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद या खरीप पिकांवर झाला आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन निश्चितपणे भरीव मदत करण्यात येईल. शासकीय यंत्रणांनी शेतकऱ्यांच्या अडचणी संवेदनशीलतेने समजून घेऊन त्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना राबविली आहे, त्याप्रमाणे यावेळीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिे साहेब व श्रीमती.सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतक-यांना तातडीने मदत करेल.
पीक परिस्थिती लक्षात घेऊन मुदतपूर्व पीक पाहणीचे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश कृषी मंत्र्यांनी यावेळी दिले. नुकसानग्रस्त भागाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ट्रान्सफॉर्मरबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश
बैठकीदरम्यान अनेक लोकप्रतिनिधींनी महावितरणकडून ट्रान्सफॉर्मर वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत असल्याची तसेच उपलब्ध सिंचनाच्या पाण्याचा लाभ घेण्यात अडथळे येत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. याची दखल घेत कृषीमंत्री भरणे यांनी निरंतर योजनेतून नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्याबाबत तसेच नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत निर्देश दिले. वीज वितरणाचे डीपी उघड्या व धोकादायक अवस्थेत राहणार नाहीत, याची दक्षता घेऊन आवश्यक ती तातडीची उपाययोजना करावी, असेही त्यांनी सांगितले.
‘फेक’ बातम्यांबाबत सावध राहण्याचे आवाहन
दरम्यान, समाजमाध्यमांवर दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी म्हणून एक खोटी यादी प्रसारित करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. शासनाने अद्याप अशी कोणतीही यादी जाहीर केलेली नसल्याचे कृषीमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले. “कुणीही खोटी माहिती प्रसारित करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये. अशा प्रकारे चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांनी अफवा आणि अनधिकृत समाजमाध्यमांवरील संदेशांवर विश्वास न ठेवता शासनाकडून अधिकृतरीत्या जाहीर होणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी