
* दररोज सरासरी ११,००० पेक्षा अधिक जणांवर दंडात्मक कारवाई आणि ९२.०३ लाख रुपयांची वसुली
मुंबई, 20 सप्टेंबर (हिं.स.) - सुरक्षित, सुलभ आणि सन्मानजनक प्रवासाची खात्री करण्याच्या आपल्या कटिबद्धतेनुसार, मध्य रेल्वेने आपल्या संपूर्ण नेटवर्कवर अनधिकृत आणि विनातिकीट प्रवासाविरुद्धची कारवाई अधिक तीव्र केली आहे. किमान दंडाच्या रकमेत झालेली वाढ आणि तिकीट तपासणीच्या तीव्र मोहिमांमुळे आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये (ऑगस्ट २०२६ पर्यंत) महत्त्वपूर्ण परिणाम दिसून आले आहेत.
एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत विक्रमी कारवाई आणि उत्पन्न
एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत, मध्य रेल्वेच्या समर्पित तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट किंवा अयोग्य/अवैध प्रवास करणाऱ्या १८.०३ लाख प्रवाशांना पकडले आणि १४०.८१ कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल केला. गेल्या वर्षी याच कालावधीत १७.१९ लाख प्रकरणे आणि १००.५० कोटी रुपयांचा दंड नोंदवला गेला होता; त्या तुलनेत यावर्षी प्रकरणांच्या संख्येत जवळपास ५% आणि उत्पन्नात ४०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
दंड वसुली आणि प्रकरणांची संख्या
एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या कालावधीतील विभागनिहाय कामगिरी:
मुंबई विभाग: ८.८० लाख प्रकरणांतून ५८.४६ कोटी रुपये
भुसावळ विभाग: ३.४२ लाख प्रकरणांतून ३५.५२ कोटी रुपये
पुणे विभाग: १.८६ लाख प्रकरणांतून १६.२९ कोटी रुपये
नागपूर विभाग: २.११ लाख प्रकरणांतून १५.८३ कोटी रुपये
सोलापूर विभाग: ०.९५ लाख प्रकरणांतून ६.१३ कोटी रुपये
मुख्यालय: ०.८८ लाख प्रकरणांतून ८.५७ कोटी रुपये
ऑगस्ट २०२६ महिन्यात, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट किंवा अवैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या २.५७ लाख प्रवाशांना पकडले; ऑगस्ट २०२५ मध्ये ही संख्या २.७६ लाख इतकी होती. ऑगस्ट २०२६ मध्ये दंडापोटी १९.५० कोटी रुपये वसूल करण्यात आले, तर ऑगस्ट २०२५ मध्ये ही रक्कम १३.७८ कोटी रुपये होती. यावरून दंड वसुलीच्या रकमेत ४१ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे दिसून येते.
वैध तिकिटाशिवाय प्रवास करणे हा रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा आहे आणि त्यासाठी दंडात्मक कारवाई केली जाते. विनातिकीट प्रवासामुळे रेल्वेच्या महसुलावरही परिणाम होतो; हा महसूल प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी वापरला जातो.
विनातिकीट प्रवासासाठीचा किमान दंड २५० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आल्यानंतर, मध्य रेल्वेने आपल्या संपूर्ण नेटवर्कवर तिकीट तपासणीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. यासाठी स्थानकांवरील तपासणी, अचानक धाडी, 'फोर्ट्रेस' तपासणी (प्रवेश आणि निर्गमन मार्गांवर कडक तपासणी), सखोल तपासणी आणि 'मेगा' तिकीट तपासणी मोहीम अशा विविध पद्धतींचा अवलंब केला जात आहे. या मोहिमा मेल/एक्सप्रेस गाड्या, पॅसेंजर गाड्या, विशेष गाड्या तसेच मुंबई आणि पुणे विभागांतील उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये राबवल्या जातात.
प्रवाशांना आवाहन
मध्य रेल्वे सर्व प्रवाशांना आवाहन करते की, गैरसोय आणि दंड टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकीट काढून सन्मानपूर्वक व जबाबदारीने प्रवास करावा. विनातिकीट प्रवासाबाबत रेल्वेचे धोरण 'झिरो टॉलरन्स' (शून्य सहिष्णुता) आहे आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व सन्मानजनक असावा, यासाठी रेल्वे कटिबद्ध आहे. जबाबदारीने प्रवास करा, सन्मानाने प्रवास करा
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी