‘सेवा संकल्प अभियाना’साठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे - नांदेड जिल्हाधिकारी
नांदेड, 20 सप्टेंबर (हिं.स.)। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘सेवा परमोधर्म’ या उक्तीनुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विविध शासकीय सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी 17 ऑक्टोबर
अ


नांदेड, 20 सप्टेंबर (हिं.स.)।

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘सेवा परमोधर्म’ या उक्तीनुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विविध शासकीय सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी 17 ऑक्टोबर 2026 दरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाची नांदेड जिल्ह्यात प्रभावी व यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवून उपक्रमांचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. दरम्यान, या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी शासकीय योजना व सेवांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

‘सेवा संकल्प अभियान’च्या जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, सर्व उपविभागीय अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजपाल कोल्हे, नगर पालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त , यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नागरिककेंद्री विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, सेवा व उपक्रमांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांमध्ये शासकीय योजनांविषयी जनजागृती करणे तसेच प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले.

या अभियानांतर्गत ‘सेवा सेतू अभियान’, ‘इनोव्हेशन चॅलेंज’, ‘सेवा माझे योगदान’, ‘विकसित भारत संकल्प यात्रा’, ‘सेवा ज्योत यात्रा’, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, ‘अंगणवाडी उत्सव’, ‘आशीर्वादाचा दिवा’, ‘बदलाची गोष्ट’, ‘आभार आणि संकल्पाची रांगोळी’, ‘नमो सेवा गाथा’, ‘जल, जन आणि संकल्प यात्रा’ तसेच ‘जनसेवक महाकुंभ’ यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगून सर्व विभागप्रमुखांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी तसेच अभियानात केलेल्या कामाची पूर्वीची व नंतरची छायाचित्रे आणि व्हिडीओ चित्रिकरण करून ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande