
यवतमाळ 20 सप्टेंबर (हिं.स.)। यवतमाळ परिसरातील पक्षीवैविध्यात यंदा एका विलक्षण आणि लक्षवेधी नोंदीची भर पडली आहे. चौसाळा मार्गावरील गावतलावावर भूभागात तब्बल सहा युरोपियन रोलर पक्षी एकाच वेळी आढळून आले आहेत. अवघ्या अर्ध्या किलोमीटरच्या परिसरात या स्थलांतरित पक्ष्यांची गेल्या चार-पाच दिवसांपासून सातत्याने उपस्थिती असून, सकाळी साधारण ६.३० ते ९ या वेळेत त्यांचे सहज दर्शन होत आहे.
यवतमाळ परिसरात युरोपियन रोलर पक्ष्याची नोंद साधारणपणे वर्षातून एखाद-दुसऱ्या पक्ष्यापुरती मर्यादित राहते आणि ती प्रामुख्याने ऑक्टोबर महिन्यात होत असल्याचे पक्षी निरीक्षणातून दिसून येते. त्यामुळे यंदा सप्टेंबर महिन्यातच सहा युरोपियन रोलर एकाच ठिकाणी दिसणे ही विशेष बाब मानली जात आहे. युरोपियन रोलर हा अत्यंत देखणा आणि आकर्षक स्थलांतरित पक्षी आहे. त्याच्या शरीरावर निळसर-फिरोजी रंगाची उठावदार झाक असून, पाठीकडील भागावर तांबूस-तपकिरी रंगाची छटा दिसते. त्याची चोच काळसर, मजबूत आणि किंचित वाकलेली असते. उड्डाण करताना पंखांवरील निळ्या आणि काळसर रंगांची उठावदार रचना विशेष मोहक भासते.
मोकळ्या माळरानातील एखाद्या उंच ठिकाणी बसून भक्ष्यावर झडप घालणे ही त्याची वैशिष्ट्यपूर्ण हालचाल आहे. हा पक्षी युरोप तसेच पश्चिम आणि मध्य आशियातील प्रदेशात प्रजनन करतो आणि हिवाळ्याच्या काळात आफ्रिकेच्या दिशेने स्थलांतर करतो. स्थलांतराच्या प्रदीर्घ प्रवासात योग्य अधिवास, मुबलक खाद्यस्रोत आणि सुरक्षित विश्रांतीस्थळे त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरतात. येथील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. प्रवीण जोशी यांनी या सहा युरोपियन रोलरची नोंद केली आहे. त्यांच्या निरीक्षणानुसार, हे पक्षी गेल्या चार-पाच दिवसांपासून याच परिसरात असून, सकाळच्या वेळेत त्यांचे निरीक्षण करणे तुलनेने सोपे आहे.
अनुकूल हवामान कारणीभूत
यंदा एकाच परिसरात सहा पक्ष्यांची उपस्थिती का दिसून आली, यामागे अनुकूल हवामान, स्थलांतराच्या मार्गातील परिस्थिती, खाद्याची मुबलक उपलब्धता किंवा विश्रांतीसाठी अनुकूल अधिवास, अशी विविध कारणे असू शकतात. मात्र नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी त्यांच्या पुढील हालचाली, खाद्यवर्तन आणि अधिवासाच्या वापराचे सातत्याने निरीक्षण करणे आवश्यक आहे. पक्षी अभ्यासक आणि छायाचित्रकारांसाठी ही दुर्मीळ संधी असून, पक्ष्यांना कोणताही त्रास न देता सुरक्षित अंतरावरून त्यांचे निरीक्षण करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी