पदाधिकारी बदलावरून ‘उमेद’मध्ये उफाळला वाद
वर्धा, 20 सप्टेंबर (हिं.स.)। महिला पदाधिकाऱ्याचा अधिकाऱ्यांवर दबावाचा आरोप महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) स्वाभिमान प्रभाग संघ, गिरड येथील पदाधिकारी बदलाच्या प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला आहे. प्रभाग संघाच्या सचिव नि
पदाधिकारी बदलावरून ‘उमेद’मध्ये उफाळला वाद


वर्धा, 20 सप्टेंबर (हिं.स.)।

महिला पदाधिकाऱ्याचा अधिकाऱ्यांवर दबावाचा आरोप

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) स्वाभिमान प्रभाग संघ, गिरड येथील पदाधिकारी बदलाच्या प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला आहे. प्रभाग संघाच्या सचिव निर्मला श्रीराम दडमल यांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद, वर्धा यांच्याकडे निवेदन देत पदाधिकारी बदलाच्या प्रक्रियेत नियम डावलण्यात आल्याचा तसेच अधिकाऱ्यांकडून दबाव आणण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. स्वाभिमान प्रभाग संघाची नियमित मासिक बैठक २० ऑगस्ट रोजी होणे अपेक्षित होते. मात्र, ग्रामसभेचे कारण सांगून बैठक २१ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. बैठकीबाबत पदाधिकाऱ्यांना पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. बैठकीच्या संदेशात मासिक आढावा व सीआरपी कट-ऑफफॉर्मचा उल्लेख होता; मात्र पदाधिकारी बदलाचा विषय घेतला जाणार असल्याची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, असे दडमल यांनी म्हटले आहे. या बैठकीस तालुका अभियान कक्ष, समुद्रपूर येथील क्षमता बांधणी तालुका व्यवस्थापक दिनेश आरसे उपस्थित होते. त्यांनी आपला कार्यकाळ संपल्याचे सांगून राजीनामा देण्याबाबत विचारणा केली आणि त्यातून दबाव निर्माण झाल्याचा आरोप दडमल यांनी केला आहे. मला पदाचा मोह नाही; मात्र पदाधिकारी बदलाची प्रक्रिया नियमांनुसार आणि सर्व सदस्यांच्या सहभागातून झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

महिला संघटनेच्या स्वायत्ततेवर प्रश्न पदाधिकारी बदलासाठी विशेष सभा किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन विषय सर्व सदस्यांसमोर मांडणे, चर्चा करणे आणि आवश्यक असल्यास मतदानाद्वारे निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे दडमल यांचे म्हणणे आहे. उमेद अभियान महिलांच्या सामूहिक संघटनावर आधारित असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन करावे; मात्र निर्णयप्रक्रियेत दबाव आणू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, बँक सखीच्या बदलाच्या मुद्द्यावरही वारंवार फोन करून बदलासाठी दबाव आणण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे प्रभाग संघातील तणाव आणि आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

--------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande