
यवतमाळ, 20 सप्टेंबर (हिं.स.)।
पावसाअभावी शेतात वाळले सोयाबीन; कापसाची वाढही खुटंली
एकीकडे आभाळात ढगांची गर्दी आणि दुसरीकडे पावसाविना करपणारी शेती, असे विदारक चित्र सध्या आर्णी तालुक्यातील शेतशिवारात पाहायला मिळत आहे. शेतांतील झाडे वाळू लागली आहेत. काही झाडांना शेंगा लागल्या असल्या तरी त्यात दाणेच भरले नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभे पीक अक्षरशः हातातून निसटताना दिसत आहे.
सोयाबीनची उगवण आणि सुरवातीची वाढही चांगली झाली. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, पिकाला शेंगा लागण्यास सुरुवात होताच पावसाने पाठ फिरविली. जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाल्याने पिकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. पावसाअभावी अनेक शेतांमध्ये सोयाबीनची पाने पिवळी पडून झाडे वाळत आहेत. काही ठिकाणी शेंगा लागल्या असल्या तरी त्या अपुऱ्या भरलेल्या आहेत. अनेक शेंगा उघडून पाहिल्यास दाणेच तयार झाले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डोळ्यांसमोर उभे असलेले पीक असूनही हातात किती उत्पादन पडणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. केवळ कोरडवाहू शेतीचीच ही अवस्था नाही. विहीर, बोअरवेल किंवा अन्य सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनाही मोठ्या क्षेत्रावरील पिकाला पुरेसे पाणी देणे शक्य होत नाही. परिणामी शेंगा भरण्याच्या निर्णायक अवस्थेत सोयाबीनची वाढ खुंटत आहे.
प्रत्यक्ष पाहणीची मागणी
दुष्काळाच्या झळा आता केवळ आकडेवारीत नाही, तर शेतशिवारात स्पष्ट दिसत आहेत. एका बाजूला पावसाची प्रतीक्षा करणारा शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला दाणे न भरलेल्या सोयाबीन यंदाच्या खरीप संकटाचे हे विदारक वास्तव आहे. प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी